पूरग्रस्त भामरागडमध्ये लॉयड्सची मदतीची धाव
एअरलिफ्टसह ३०० हून अधिक नागरिकांना फळे, अल्पोपहार व ORS; पुढील टप्प्यात फूड किटचे वितरण
भामरागड/हेदरी, दि. २७ सप्टेंबर : भामरागड परिसरातील पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला असताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉयड्स इनफिनिट फाउंडेशनच्या माध्यमातून मदत व बचावकार्य सुरू आहे. गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी एअरलिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना औषधे, ORS, फळे आणि अल्पोपहाराची मदत केली जात आहे.
२७ सप्टेंबर रोजी पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना एअरलिफ्ट करून हेदरी येथील LKAMH रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी २६ सप्टेंबर रोजी भामरागड येथील सुखदेव उगले (४२) यांना छातीत दुखत असल्याने आपत्कालीन एअरलिफ्ट करण्यात आले होते. त्यांना हवाई मार्गाने कोंसरी येथे आणल्यानंतर पुढील उपचारांसाठी रुग्णवाहिकेद्वारे चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
लॉयड्सच्या मदतकार्यांतर्गत आतापर्यंत ३०० हून अधिक नागरिकांना फळे, अल्पोपहार आणि ORS उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पूरग्रस्त गावांमध्ये पोहोचण्याची परिस्थिती सुधारल्यानंतर प्रभावित कुटुंबांना फूड किट, ब्लँकेट, साड्या आणि इतर जीवनावश्यक वस्तू वितरित करण्याची तयारी करण्यात आली आहे.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली हे मदतकार्य सुरू आहे. पूरामुळे निर्माण झालेल्या अडचणींच्या काळात नागरिकांना वेळेवर वैद्यकीय उपचार आणि आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यावर कंपनीकडून भर देण्यात येत आहे.
“पूरामुळे कुटुंबांना अनिश्चितता आणि अडचणींचा सामना करावा लागत असताना त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आमची पहिली जबाबदारी आहे. तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना विलंब न होता उपचार मिळावेत यासाठी आमचे डॉक्टर आणि आपत्कालीन एअरलिफ्ट सुविधा तैनात केली आहे,” असे बी. प्रभाकरन यांनी सांगितले.
पूरस्थिती सुधारत नाही तोपर्यंत प्रभावित नागरिकांना आवश्यक ती मदत सुरू ठेवण्याची भूमिका लॉयड्सकडून घेण्यात आली आहे.
Tags:
मदत