‘शंभर रुपयांची नोट पडली’ म्हणत लक्ष विचलित केले; चामोर्शीत साडेपाच लाखांवर डल्ला!

 ‌                  (प्रतिनिधीक छायाचित्र)

‘शंभर रुपयांची नोट पडली’ म्हणत लक्ष विचलित केले; चामोर्शीत साडेपाच लाखांवर डल्ला!

शेतकरी बचत गटाच्या कर्जाच्या रकमेची चोरी; बसस्थानक परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

चामोर्शी, दि. ८ : शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी बँकेतून काढून आणलेली तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड दिवसाढवळ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (७ ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास चामोर्शी शहरातील बसस्थानक परिसरात घडली. ‘तुमची शंभर रुपयांची नोट खाली पडली आहे’ असे सांगून लक्ष विचलित करत चोरट्यांनी दुचाकीच्या टाकीवर ठेवलेली पैशांची बॅग हातोहात पळवून नेली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

जय गणेश शेतकरी पुरुष बचत गट, लखमापूर-बोरीचे अध्यक्ष घनश्याम बोलीवार आणि सचिव रामचंद्र सत्तरवार हे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी चामोर्शी येथील बँक ऑफ इंडिया शाखेत आले होते. दुपारी साडेबारा वाजता बँकेतून ५ लाख ५० हजार रुपये काढल्यानंतर ही रक्कम बॅगेत ठेवून दोघे दुचाकीने निघाले.

बसस्थानक परिसरातील सुमित मेडिकलजवळ दोघे काही वेळ थांबले. घनश्याम बोलीवार हे खरेदीसाठी दुकानात गेले, तर रामचंद्र सत्तरवार हे बसस्थानकाच्या दिशेने गेले. याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने सत्तरवार यांना मागून आवाज देत ‘तुमची शंभर रुपयांची नोट खाली पडली आहे’ असे सांगितले.

नोट खाली पडल्याचे सांगितल्याने सत्तरवार यांनी मागे वळून पाहताच, आधीपासून पाळत ठेवून असलेल्या दुसऱ्या साथीदाराने दुचाकीच्या टाकीवर ठेवलेली रोकड असलेली बॅग लंपास केली. त्यानंतर दोन्ही आरोपी तेथून पसार झाले. काही क्षणांतच बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास

घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. बसस्थानक परिसरातील तसेच आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, संशयितांच्या हालचाली, त्यांचा पळून जाण्याचा मार्ग आणि संभाव्य साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

दिवसा वर्दळीच्या ठिकाणी चोरी; नागरिकांत चिंता

शहरातील अत्यंत वर्दळीच्या बसस्थानक परिसरात दिवसाढवळ्या साडेपाच लाखांची रोकड चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. आरोपींनी आधीपासून पाळत ठेवून ही चोरी केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसून पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
थोडे नवीन जरा जुने