कारने अचानक पेट घेतला; चौघे बालंबाल बचावले!


कारने अचानक पेट घेतला; चौघे बालंबाल बचावले!

सोमनपल्लीजवळ आगीने घेतले रौद्ररूप; टाटा व्हिस्टा कार जळून खाक

आष्टी, दि. ७ ऑक्टोबर  : आष्टीहून चामोर्शीकडे जात असलेल्या टाटा व्हिस्टा कारला अचानक आग लागून कार काही वेळातच जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि. ७) सकाळच्या सुमारास सोमनपल्ली गावाजवळ घडली. या घटनेत कारमधील चार जणांनी प्रसंगावधान राखत वेळीच कारबाहेर पडल्याने ते बालंबाल बचावले.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली येथील आरमोरी येथे मेडिकल असोसिएशनची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला जाण्यासाठी आष्टी येथील मेडिकल व्यावसायिक पराग गोनपल्लीवार, रुपेश विरुळकर, जितेंद्र निमसरकार आणि सम्रेश बाच्छाळ हे चौघे एमएच ३३ ए ३४३१ क्रमांकाच्या टाटा व्हिस्टा कारने निघाले होते.

आष्टीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर सोमनपल्ली गावाजवळ अचानक कार बंद पडली. त्यामुळे चौघेही कारमधून खाली उतरले. कारमध्ये नेमकी काय तांत्रिक अडचण निर्माण झाली, हे पाहत असतानाच कारने अचानक पेट घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने चौघांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता वाढत गेल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. पाहता-पाहता आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली कार पूर्णपणे जळून खाक झाली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस पोहोचेपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.

या घटनेत सुदैवाने कारमधील चौघेही सुरक्षित बचावल्याने मोठी दुर्घटना टळली. कारला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

थोडे नवीन जरा जुने