दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; अकरावी-बारावीची परीक्षा फी माफ करा!
एटापल्लीतील महिलांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन; पिकांचे पंचनामे करून संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी
एटापल्ली, दि. ३० सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने अनेक भागांत सुका दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतातील पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, पिकांचे पंचनामे करावेत आणि संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी एटापल्लीतील महिलांनी निवेदनातून केली.
यासंदर्भात मा. उपविभागीय अधिकारी (SDM), उपविभागीय अधिकारी कार्यालय, एटापल्ली यांना दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके तसेच मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके वाळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मंजूर करावी, तसेच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
विद्यार्थ्यांचीही आर्थिक कोंडी; फी माफीची मागणी
दुष्काळाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांनाही बसत असल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा विचार करून अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची शाळा फी तसेच परीक्षा फी माफ करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली.
निवेदन देताना उपस्थित
निवेदन देताना सौ. पौर्णिमा राकेश श्रीरामवार (अध्यक्ष, सावित्रीच्या लेकी संस्था), सुनिता मोहन चाडीकर (अध्यक्ष, दक्षता समिती), गुलशन शेख (सचिव, सावित्रीच्या लेकी संस्था), कलिमा शेख, रेहाना शेख, शालिनी नेताम, विजया जांबोवार, बेबीताई हेडा, मनिषा नाडमवार आणि जयश्री खोब्रागडे आदी उपस्थित होत्या.