सुभाषग्राममध्ये वन्यप्राणी शिकारीचा पर्दाफाश; दोघे वनविभागाच्या ताब्यात
वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये वनगुन्हा दाखल; अन्य साथीदारांचा सहभाग तपासणीच्या फेऱ्यात
आष्टी : आलापल्ली वनविभागांतर्गत मार्कंडा (कं.) वनपरिक्षेत्रातील गुंडापल्ली उपक्षेत्राच्या बहादूरपूर नियतक्षेत्रातील सुभाषग्राम येथे अवैध वन्यप्राणी शिकारीविरोधात वनविभागाने धडक कारवाई केली. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन्यप्राण्यांची अवैध शिकार होत असल्याच्या संशयावरून वनविभागाच्या पथकाने सुभाषग्राम परिसरात कारवाई केली. यावेळी दुर्लभ निर्मल ढाली, रा. सुभाषग्राम आणि विश्वजीत रविंद्र राय, रा. तुमडी यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांची चौकशी सुरू असून, वन्यजीव शिकारीशी संबंधित इतर व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपासही वनविभागाकडून केला जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असून, शिकारीच्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्याच्या दृष्टीने चौकशी केली जात आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक शैलेश मीना व सहायक वनसंरक्षक मोहम्मद आजाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी टी. एम. मोढळे (मार्कंडा कं.), क्षेत्र सहाय्यक आर. एल. बानोत, वनरक्षक एस. जी. राठोड, एन. डी. सोनवणे, सुनील खेत्रागाडे व बी. के. लिंपटे यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
दरम्यान, वन्यप्राण्यांची अवैध शिकार, तस्करी अथवा वन्यजीवांशी संबंधित कोणतीही बेकायदेशीर कृती आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनविभागाने दिला आहे. तसेच वन्यजीव व वनसंपदेच्या संरक्षणासाठी नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags:
वनविभाग