तालुका माळी समाज संघटनेची पुनर्रचना; सुधाकर निकोडे अध्यक्षपदी

तालुका माळी समाज संघटनेची पुनर्रचना; सुधाकर निकोडे अध्यक्षपदी

तालुका प्रतिनिधी चामोर्शी :- तालुका माळी समाज संघटना, चामोर्शीची सहविचार सभा रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला चामोर्शी तालुक्यातील माळी समाजाचा समावेश असलेल्या विविध गावांमधून समाजबांधवांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाज संघटनेच्या पुनर्रचनेसह समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
सभेस जिल्हा माळी समाज संघटनेचे अध्यक्ष देवरावजी मोहुर्ले, गडचिरोली जिल्हा अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष भीमराज पात्रीकर तसेच जिल्हा माळी समाज संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी उपस्थितांमधून भैयाजी वाढई यांची सभाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर व समाजबांधवांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी तालुक्याचे माजी अध्यक्ष जयराम मोहुर्ले सर, शुभम कावळे तसेच तालुक्यातील माळी समाजातील दिवंगत समाजबांधवांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
समाज संघटनेच्या पुनर्रचनेचा महत्त्वपूर्ण निर्णय
सभेत तालुका माळी समाज संघटनेचे पुनर्गठन करण्याचा विषय प्रमुखत्वाने चर्चेला घेण्यात आला. समाजाची एकजूट अधिक बळकट करणे, समाजातील विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडणे, सामाजिक उपक्रमांना चालना देणे तसेच तालुक्यातील समाजबांधवांमध्ये समन्वय निर्माण करण्याच्या उद्देशाने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत सुधाकर निकोडे यांची अध्यक्षपदी, तर प्रभाकर भेंडारे व भैयाजी वाढई यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. इंदुताई मोहुर्ले यांची कार्याध्यक्ष, बंडोपंत गुरनुले यांची कोषाध्यक्ष आणि गिरीधर मोहुर्ले यांची सचिवपदी निवड झाली.
विठ्ठल बोरुले, सुरज वसाके आणि श्रीकांत मोहुर्ले यांची सहसचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. बाबुराव शेंडे यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.
कार्यकारिणीतील सदस्य म्हणून गुलाब मोहुर्ले, दयाराम वाढई, साईनाथ गावतुरे, सचिन मोहुर्ले, वामन वाटगुरे, खुशाल कावळे, घनश्याम मांदाडे, अंबादास निकुरे, साईनाथ गुरनुले, सुरेश सोनुले, अजय चौधरी, महादेव निकोडे, खुशालजी वाढई, दिपक मोहुर्ले, अशोक कावळे, बेबीबाई निकोडे, मायाताई गुरनुले, समीर वाढई, प्रवीण वाढई, भालचंद्र वाढई आणि विश्वनाथ सोनुले यांचा समावेश करण्यात आला.
छत्रुघ्न गुरनुले यांची सहकोषाध्यक्ष म्हणून, तर सुरेश सोनुले, अजय चौधरी आणि महादेव निकोडे यांची प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. रुपालीताई मोहुर्ले यांच्यावर महिला प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या माध्यमातून तालुक्यातील माळी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यावर सभेत भर देण्यात आला.
सभेचे सूत्रसंचालन महादेव निकोडे यांनी केले. मनोज सोनुले यांनी प्रास्ताविकातून सभेची भूमिका व उद्देश स्पष्ट केला. शेवटी अरविंद मोहुर्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर सभेचा समारोप करण्यात आला.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे तालुका माळी समाज संघटनेला नव्या नेतृत्वासह संघटनात्मक बळ मिळाले असून, आगामी काळात समाजहितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची अपेक्षा समाजबांधवांकडून व्यक्त करण्यात आली.
थोडे नवीन जरा जुने