देशी दारू वाहतुकीच्या संशयावरून महिला पोलिसांच्या ताब्यात

देशी दारू वाहतुकीच्या संशयावरून महिला पोलिसांच्या ताब्यात

शेकरू पार्कजवळ आष्टी पोलिसांची कारवाई; ६६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त


आष्टी : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी–रायपूर मार्गावरील शेकरू पार्कजवळ देशी दारूची वाहतूक केल्याच्या संशयावरून एका महिलेला आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई आज २८ सप्टेंबर २०२६ रोजी  साडेअकराच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी कोनसरी–रायपूर रोडवरील शेकरू पार्कजवळ एका महिलेच्या ताब्यातील वाहनाची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान संबंधित महिलेचे नाव ईती प्रदीप बैरागी (वय ३६, व्यवसाय मजुरी, रा. विष्णूपूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) असे असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तिच्या ताब्यातील टीव्हीएस ज्युपिटर (एमएच ३३ ए.के. २८१३) या वाहनातून ९० एमएल मापाच्या रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीच्या ८० निपा आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दारूचा साठा आणि संबंधित दुचाकी असा एकूण ६६ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत पोलीस हवालदार मुनघाटे, सिडाम तसेच महिला पोलीस अंमलदार चंदनखेडे सहभागी होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जितेंद्र मुनघाटे करीत आहेत.
थोडे नवीन जरा जुने