राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा- विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत जोपासावे- गणेश शिंगाडे.
आष्टी प्रतिनिधी
आष्टी : महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन
आष्टी, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुसने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गणेश शिंगाडे, साम टीव्ही जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना गणेश शिंगाडे यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधावा आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. एनएसएसच्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव व सेवाभाव विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मुसने यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन स्व-विकासासोबत सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात एनएसएस स्वयंसेविका कुमारी ममता नरोटे व कुमारी शुभांगी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे व कार्याबाबत माहिती दिली. यावेळी डॉ. फुलझेले, डॉ. शास्त्रकार, डॉ. पांडे, डॉ. बोभाटे व डॉ. कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. रवी गजभिये यांनी केले. डॉ. खुने यांनी प्रास्ताविक केले, तर कुमारी राणी हिने आभार मानले.
राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात प्राध्यापक, कर्मचारी आणि एनएसएस स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
Tags:
शिक्षण विभाग