लोकशाही मूल्यांची जपणूक; भारतरत्न डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यालयात छात्रसंघ पदाधिकाऱ्यांची निवडणूक उत्साहात...
बहुमताने विजयी झालेल्या छात्रसंघ पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत; शालेय विकास व विद्यार्थी प्रगतीवर मार्गदर्शन....
तालुका प्रतिनिधी चामोर्शी :
भारतरत्न डॉ.बी.आर. आंबेडकर विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व, नेतृत्वगुण आणि जबाबदारीची जाणीव व्हावी, या उद्देशाने छात्रसंघ पदाधिकाऱ्यांची निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी या निवडणूक प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोकशाही पद्धतीने आपल्या प्रतिनिधींची निवड केली.
निवडणुकीनंतर बहुमताने विजयी झालेल्या छात्रसंघ पदाधिकाऱ्यांचे विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत विद्यार्थ्यांच्या समस्या, शालेय उपक्रमांमध्ये सहभाग, शिस्त, नेतृत्व आणि विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक भूमिका बजावण्याचे आवाहन करण्यात आले.
यानंतर विभाग प्रमुख संदीप कोचे सर यांच्या माध्यमातून शिक्षकवृंद तसेच नवनिर्वाचित छात्रसंघ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनपर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत विद्यालयात राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक व विद्यार्थीहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे कसे राबविता येतील, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने विद्यालयाचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक रवींद्र उराडे होते. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, शिस्त, जबाबदारीची भावना आणि लोकशाही वृत्ती विकसित होणे आवश्यक असल्याचे सांगितले. छात्रसंघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेतील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळते. या संधीचा उपयोग विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विकासासोबतच विद्यालयाच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
स्काऊट शिक्षक कालिदास बन्सोड यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नेतृत्व हे केवळ पदापुरते मर्यादित नसून त्यामागे जबाबदारी, शिस्त, सेवाभाव आणि संघभावना असणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. छात्रसंघ पदाधिकाऱ्यांनी इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करावा आणि शाळेतील प्रत्येक उपक्रमात सकारात्मक सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.
विभाग प्रमुख संदीप कोचे यांनी छात्रसंघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याबरोबरच शाळेतील विविध उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्यात सामाजिक बांधिलकी, नागरिकत्वाची जाणीव आणि लोकशाही मूल्ये निर्माण करणे ही शाळेची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी दुर्गेश वालदे सर, संजय आलेवार सर, रजनी मेश्राम मॅडम यांच्यासह शाळा मंत्री आर्यन अलोने, शाळा उपमंत्री अथर्व पुच्छलवार,सहलमंत्री अंकुश गरपल्लीवार, क्रीडामंत्री जतीन निकोडे, स्वच्छता व पर्यावरण मंत्री वेदांत मडावी, मुलींची प्रतीनीधी अंकिता सोयाम, तसेच विद्यालयातील शिक्षकवृंद आणि छात्रसंघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतल्याने त्यांना मतदान, बहुमत, नेतृत्व, प्रतिनिधित्व आणि लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याचा अनुभव मिळाला. त्यामुळे विद्यालयात घेण्यात आलेली ही छात्रसंघ निवडणूक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या सामाजिक व लोकशाही जडणघडणीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली.सभेचे संचालन तथा आभार प्रदर्शन कालिदास बन्सोड सर यांनी केले.