संस्थाध्यक्ष गोवर्धन चव्हाण यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांतून उत्साहात साजरा

संस्थाध्यक्ष गोवर्धन चव्हाण यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांतून उत्साहात साजरा

तालुका प्रतिनिधी चामोर्शी:-
महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रेखेगाव-अनंतपूर येथे तिन्ही आश्रमशाळांच्या संयुक्त विद्यमाने संस्था अध्यक्ष गोवर्धन चव्हाण यांचा ६४ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कार्याचे स्मरण करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक व नैतिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष गोवर्धन चव्हाण होते. संस्थेच्या सचिव सौ. गीताताई चव्हाण मॅडम यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाशजी ताकसांडे उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक गोर्लावार सर, सौ. मनिषाताई गोर्लावार मॅडम, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जे .एस. चव्हाण,आर.एस.मांडोळे सर, जेष्ठ शिक्षक गुलाब धोती, विनोद चव्हाण सर, प्रभारी मुख्याध्यापक तथा प्राचार्य नाकाडे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय नाईक यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या कृषी, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील योगदानाचे स्मरण केले.
यानंतर संस्था अध्यक्ष गोवर्धन चव्हाण यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त केक कापून व शालेय प्रांगणात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक गोर्लावार सर व त्यांच्या पत्नी मनिषा गोरलावार यांचा संस्थाध्यक्ष गोवर्धन चव्हाण तसेच त्यांच्या सहचारिणी सौ. गीताताई गोवर्धन चव्हाण यांच्याकडुन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर उपस्थितांनी चव्हाण दाम्पत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना गोवर्धन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी खोटे न बोलता नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारावा, नियमित अभ्यास करावा आणि जीवनात मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रमुख साधन असून मेहनत, शिस्त आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे प्रकाश ताकसांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाची आवड जोपासण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी भरपूर पुस्तके वाचावीत, आपल्या गुरुजनांचा आदर करावा आणि शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यात मोठे व्यक्तिमत्त्व घडवून समाजाची सेवा करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच संस्था अध्यक्ष गोवर्धन चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.
दरम्यान, संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही गोवर्धन चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनींनी गाणी सादर करून तसेच नृत्य सादरीकरणातून चव्हाण यांना शुभेच्छा दिल्याने कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपले कलागुण सादर केले.
विशेष म्हणजे याच कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी संदीप येरकरी याचाही केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यामुळे संस्थाध्यक्षांच्या वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत सामायिक करण्याचा सामाजिक व आपुलकीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक तथा प्राचार्य नाकाडे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करत स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य आणि संस्थाध्यक्ष गोवर्धन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन किशोर वावरे यांनी केले, तर राहुल बोबाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*बाक्स*:-स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन, संस्थाध्यक्षांचा वाढदिवस, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व ,विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक सादरीकरण अशा विविध उपक्रमांनी हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
थोडे नवीन जरा जुने