जपतलईच्या सर्पदंशग्रस्त दीपिका लकडा यांच्या कुटुंबीयांना ओम साई राम स्टील कंपनीचा मदतीचा हात
जिल्हा प्रतिनिधी | जनार्दन नल्लावार
महाराष्ट्र प्रहार न्यूज
एटापल्ली (गडचिरोली) : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंश झाल्याने कु. दीपिका एतवा लकडा या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या दुःखद प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत ओम साई राम स्टील कंपनी, वेलमागड यांनी पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला.
ओम साई राम स्टील कंपनीच्या सामाजिक भावनेतून १ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. कंपनीच्या वतीने देण्यात आलेला धनादेश अहेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते दीपिका लकडा यांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. या मदतीमुळे दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळाला असून, कंपनीने दाखविलेल्या सामाजिक संवेदनशीलतेचे परिसरातून कौतुक होत आहे.
यापूर्वी श्रीमती मितालीताई आत्राम यांनीदेखील दीपिका लकडा यांच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन त्यांना आर्थिक मदत केली होती. त्यानंतर कंपनीच्या वतीने करण्यात आलेल्या या मदतीमुळे पीडित कुटुंबाला आणखी एक आधार मिळाला आहे.
धनादेश वितरणाच्या वेळी एटापल्ली गट विकास अधिकारी श्री. श्रीकृष्ण पेंडाम, मा. हर्षवर्धन बाबा आत्राम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी लकडा कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला.
सामाजिक बांधिलकी जपण्याचा कंपनीचा संकल्प
यावेळी ओम साई राम स्टील कंपनीचे मॅनेजर – कॉर्पोरेट अँड CSR हेड श्री. सीताराम सोनानिया यांनी कंपनीची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “ओम साई राम स्टील कंपनीने सामाजिक भावनेतून दीपिका लकडा यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला आहे. समाजातील गरजू व संकटग्रस्त घटकांच्या पाठीशी उभे राहणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. यापुढेही सामाजिक भावनेतून अशाच प्रकारचे सामाजिक कार्य सुरू ठेवण्यात येईल.”
कंपनीकडून करण्यात आलेल्या या मदतीमुळे केवळ आर्थिक सहाय्य मिळाले नाही, तर संकटाच्या काळात समाज आणि उद्योगक्षेत्र एकत्र उभे राहू शकते, असा सकारात्मक संदेशही गेला आहे. दुर्गम भागातील नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांना आवश्यक त्या वेळी मदत करण्याची भूमिका कंपनीने घेतल्याचे यावेळी दिसून आले.
जपतलई येथील घटनेमुळे आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी नियमित स्वच्छता, परिसराची पाहणी, सर्पप्रतिबंधक उपाययोजना आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आश्रमशाळा व वसतिगृहांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
दीपिका लकडा यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत ओम साई राम स्टील कंपनीने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले असून, भविष्यातही सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचा दिलेला शब्द परिसरातील नागरिकांसाठी आश्वासक ठरत आहे. सामाजिक जबाबदारी केवळ औद्योगिक विकासापुरती मर्यादित न ठेवता स्थानिक समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची ही भूमिका निश्चितच आदर्शवत मानली जात आहे.
Tags:
मदत