गुरुपल्ली ग्रामसभेत अक्षय पुंगाटींचा आक्रमक सवाल; मूलभूत प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीची मागणी
राकेश तेलकुंटलवार उपसंपादक
महाराष्ट्र प्रहार न्यूज
गुरुपल्ली : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुपल्ली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत शिवसेना (शिंदे गट)चे एटापल्ली तालुक्यातील युवा नेते मा. अक्षय भाऊ पुंगाटी यांनी गावकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडली. पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, वीज, रोजगार आणि शेतीसह आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामस्थांनी मांडलेले प्रश्न केवळ ग्रामसभेच्या इतिवृत्तात नोंदवून ठेवण्याऐवजी त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही झाली पाहिजे, असा स्पष्ट सवाल पुंगाटी यांनी उपस्थित केला. गावाच्या विकासकामांमध्ये पारदर्शकता राखण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीच्या विकासासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून ठोस नियोजन करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणीही त्यांनी केली. ग्रामस्थांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवून गुरुपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी अक्षय पुंगाटी यांनी व्यक्त केला.
“ग्रामस्थांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवू, विकासासाठी पाठपुरावा करू आणि गावाच्या प्रगतीसाठी सदैव पुढे राहू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Tags:
शिवसेना