*जंगली जनावरांपासून बचावासाठी लावलेले उपकरण अंगाशी: विजेचा करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू*
_कुटुंबाचा आधार गेल्याने गावावर शोककळा.
विशाल मासूरकर
*यवतमाळ* राळेगाव तालुक्यातील वनोजा येथे जंगली जनावरांचा त्रास टाळण्यासाठी शेतात लावलेल्या विद्युत उपकरणाची वायर तपासताना विजेचा करंट लागून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल दि.१६ ऑगस्ट रोजी घडली.मृत शेतकऱ्याचे नाव मधुकर बापुराव भालेराव,वय ४८ वर्षे असे आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतातील पिकांची जंगली जनावरांकडून नासधूस होत होती. त्यामुळे जनावरे शेतात येऊ नयेत म्हणून मधुकर यांनी शेतात आवाज करणारे विद्युत उपकरण लावले होते.काल ते उपकरण सुरू झाले नसल्याने वायरमध्ये बिघाड झाला आहे का हे पाहण्यासाठी मधुकर शेतात गेले होते.तपासणी करत असतानाच त्यांना अचानक जोराचा विजेचा धक्का बसला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि नातेवाईक घटनास्थळी धावले. राळेगाव पोलीस यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालय राळेगाव येथे पाठविला.घराचा कर्ता पुरुष अचानक गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेने संपूर्ण वनोजा गावावर शोककळा पसरली आहे,मधुकर यांच्या पश्चात पत्नी व २ मुले असा आप्त परिवार आहे.तसेच भालेराव कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तात्काळ आर्थिक मदत व मदत निधी मिळावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
*ग्रामस्थांची मागणी*
जंगली जनावरांचा वाढता उपद्रव आणि शेतातील असुरक्षित वीज जोडण्यांमुळे शेतकरी जीव मुठीत धरून शेती करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वनविभागाने जनावरांचा बंदोबस्त करावा तसेच महावितरणने शेतातील वीज जोडण्यांची सुरक्षा तपासणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.