पोलीस स्टेशन धानोरा पोलीसांची अवैध दारु व्यवसायाविरोधात कठोर कारवाई



पोलीस स्टेशन धानोरा पोलीसांची अवैध दारु व्यवसायाविरोधात कठोर कारवाई 
 
दोन विविध ठिकाणावरील कारवाईत अवैध हातभट्टी नष्ट करत एकूण 3,44,000/- रुपयांचा मुद्देमाल नष्ट

गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व साठवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री व साठवणूक करणा­यांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन काल दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस स्टेशन धानोरा पोलीस पथकाने धानोरा हद्दीतील मौजा वानरचुवा जंगल परिसरात दोन विविध ठिकाणी सापळा रचून अवैद्य हातभट्टी मोहफुलाच्या दारुची भट्टी चालविणा­या तसेच साठवणूक करुन विक्री करणा­या आरोपींविरुध्द कारवाई केलेली आहे.

सविस्तर वृत असे आहे की, काल दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस स्टेशन धानोरा  येथील पोलीस पथकाला गोपनिय बातमिदाराकडून माहिती मिळाली की, पोस्टे धानोरा हद्दीतील नामे प्रमोद अंताराम हलामी, वय 42 वर्ष, रा. वानरचुवा ता. धानोरा, जि. गडचिरोली हा मोहफुलाच्या सडव्याची साठवणूक करुन हातभट्टी मोहफुलाची दारु अवैधरित्या तयार करीत आहे, अशा मिळालेल्या माहितीवरुन पोलीस स्टेशन धानोरा पथकाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने मौजा वानरचुवा येथील आरोपीच्या घरामागील जंगल परिसरात पाहणी केली असता, घटनास्थळावर अवैध हातभट्टी दारु निर्मितीची भट्टी मिळून आली. मात्र पोलीस पथक आल्याचा सुगावा लागल्याने आरोपी जंगल परिसराचा फायदा घेत घटनास्थळावरुन पसार झाला. यानंतर पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणाची पाहणी केली असता, घटनास्थळावरुन 1) 200 लिटर क्षमतेच्या 15 प्लास्टिक ड्रममध्ये एकूण 3000 किलो मोहफुल सडवा एकूण किंमत अंदाजे 3,00,000/- रुपये, 2) 20 लिटर मोहफुलाची हातभट्टी दारु एकूण किंमत अंदाजे 4,000/- रुपये असा एकूण 3,04,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर हातभट्टी साहित्य, तयार हातभट्टी दारु व प्लास्टीक ड्रममधील मोहफुलाचा सडवा नियमानूसार घटनास्थळावरच नष्ट करण्यात आला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे धानोरा येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. 88/2026 कलम 65 (क), 65 (ड), 65 (ई), 65 (फ) म.दा.का. अन्वये फरार आरोपी नामे प्रमोद अंताराम हलामी, वय 42 वर्ष, रा. वानरचुवा ता. धानोरा, जि. गडचिरोली याच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यासोबतच काल दिनांक 16 ऑगस्ट 2026 पोस्टे धानोरा हद्दीतील नामे शिवराम अन्नाजी बोगा, वय 45 वर्ष, रा. वानरचुवा ता. धानोरा, जि. गडचिरोली हा त्याच्या राहत्या घरी मोहफुलाची दारु अवैधरित्या विक्री करीता साठवणूक करीत असल्याची देखील माहिती पोलीस पथकास मिळाली. अशा मिळालेल्या माहितीवरुन पोलीस स्टेशन धानोरा येथील पोलीस पथकाने मौजा वानरचुवा येथील आरोपीच्या घरी धाड टाकली असता, त्याच्या घराच्या बाजुला असलेल्या झोपडीमध्ये 200 लिटर क्षमतेच्या एका प्लास्टिक ड्रममध्ये 200 लिटर मोहफुल दारुचा अंदाजे 40,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर प्लास्टीक ड्रममधील मोहफुलाची दारु नियमानूसार घटनास्थळावरच नष्ट करण्यात आली. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे धानोरा येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. 89/2026 कलम 65 (ई) म.दा.का. अन्वये आरोपी नामे शिवराम अन्नाजी बोगा, वय 45 वर्ष, रा. वानरचुवा, ता. धानोरा, जि. गडचिरोली याच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर दोन्ही गुन्ह्रांच्या अनुषंगाने पुढील कारवाई सुरु आहे.

सदर दोन्ही कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा श्री. जगदिश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे धानोराचे प्रभारी अधिकारी पोनि. कैलास गवते, पोउपनि. अजय कोरडे, पोहवा/जन्हेरसिंग उसेंडी, पोअं/सुशील मेश्राम, प्रशांत ताडोसे, राहुल बनकर, विक्रांत मोहुर्ले व मपोअं/प्रियंका कावळे यांनी पार पाडली.
थोडे नवीन जरा जुने