गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा गॅरापत्ती येथे आठवडी बाजारादरम्यान आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन
या अभिनव उपक्रमादरम्यान पोस्टे गॅरापत्ती हद्दीतील एकूण 84 नागरिकांची तज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी
पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला उपक्रम
*आरोग्य शिबिरादरम्यान फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान व पोलीस दलाच्या कार्याबद्दल करण्यात आली जनजागृती
गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्रातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. जिल्ह्रामधील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत देखील आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जात असतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने काल दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा गॅरापत्ती येथील आठवडी बाजारादरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करुन नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश चिचघरे, डॉ. रोशनी किरंगे, श्रीमती लीना नगराळे (परिचारीका) यांच्या नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सदर मेळाव्यादरम्यान हद्दीतील सुमारे 84 नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून आवश्यकतेनूसार नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यात आली तसेच विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एकूण 01 नागरिकाला आवश्यकतेनूसार विविध रुग्णालयाच्या ठिकाणी पुढील तपासणीसाठी शिफारस केलेली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन 2021 पासून आजपावेतो एकूण 206 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून जवळ-जवळ एकूण 43,000 हजार पेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केलेली आहे. तसेच एकूण 06 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एकूण 4,864 युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण 9,971 पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करुन एकूण 1,412 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्रात कार्यरत असतांना शहीद जवानांनी दिलेल्या बलिदानाबद्दल, सी-60 जवानांच्या शौर्याबद्दल व नागरी कृती उपक्रमांबद्दल आठवडी बाजारादरम्यान उपस्थित नागरिकांना विविध बॅनरच्या माध्यमातून माहिती देण्यात येऊन जनजागृती करण्यात आली.
सदर आरोग्य शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली श्री. सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. सुनिल ऊईके तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा श्री. जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे गॅरापत्तीचे पोउपनि. अक्षय निकम, पोउपनि. दिनेश खांडेकर व पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडले.