सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी विरंगुळा केंद्राची मागणी,चामोर्शी नगरपंचायतीकडे स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचे निवेदन...

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी विरंगुळा केंद्राची मागणी,
चामोर्शी नगरपंचायतीकडे स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचे निवेदन... 

तालुका प्रतिनिधी 
चामोर्शी : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना, तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने चामोर्शी शहरातील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चामोर्शी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले.
चामोर्शी शहरात विविध शासकीय, निमशासकीय तसेच इतर आस्थापनांमधून सेवानिवृत्त झालेले अनेक कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी वास्तव्यास आहेत. सेवेतून निवृत्तीनंतरचा काळ आरोग्यदायी, आनंदी आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय पद्धतीने व्यतीत करण्यासाठी त्यांना सकाळी व सायंकाळी फिरणे, व्यायाम करणे, तसेच समविचारी सहकाऱ्यांसोबत बसून विचारांची देवाणघेवाण करणे यासाठी स्वतंत्र व सुरक्षित जागेची आवश्यकता आहे.
मात्र, सध्या चामोर्शी शहरात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकत्र येऊन सामाजिक संवाद साधण्यासाठी किंवा विरंगुळ्याचा वेळ घालविण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सेवानिवृत्तीनंतरही समाजाशी नाते कायम ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अशा केंद्राची गरज असल्याचे संघटनेने निवेदनातून नमूद केले आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सामाजिक बांधिलकी, परस्पर सुसंवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण लक्षात घेता, नगरपंचायतीने आपल्या मालकीची किंवा उपलब्ध असलेली योग्य जागा ‘सेवानिवृत्त कर्मचारी विरंगुळा केंद्रा’साठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या केंद्रामध्ये बसण्यासाठी बाके, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत सुविधा, स्वच्छतागृह, वृक्षारोपण व हिरवळ यांसह आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशीही मागणी संघटनेने केली आहे. या सुविधेमुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुरक्षित व आनंददायी वातावरणात वेळ घालविता येईल, तसेच त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ समाजालाही मिळू शकेल, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या या मागणीचा नगरपंचायतीने सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि विरंगुळा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.
निवेदन देताना पदाधिकारी व सेवानिवृत्त शिक्षकांची उपस्थिती
यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष नरेंद्र कोत्तावार, तालुका सचिव देवानंद बोरकर, सल्लागार देवाजी बुरांडे सर, सल्लागार तारकल बांबोळे सर, सल्लागार हिंमतराव आभारे सर, प्रसिद्धी प्रमुख महेंद्र वासेकर यांच्यासह हेमंत चावरे, जनार्दन म्हशाखेत्री, जीवनदास गेडाम, अनिल बारई तसेच अन्य सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या मागणीवर नगरपंचायत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे चामोर्शी शहरातील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
थोडे नवीन जरा जुने