गटटेपल्ली गावात वाघाचा धुमाकूळ; बैल ठार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
शेतात वाघाच्या हल्ल्याने खळबळ; वनविभागाकडून घटनास्थळी पंचनामा
राकेश तेलकुंटलवार/ उपसंपादक
महाराष्ट्र प्रहार न्यूज
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील गटटेपल्ली गाव परिसरात वाघाने धुमाकूळ घातल्याची घटना सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी समोर आली. रामदास पुडो यांच्या शेतात वाघाने प्रवेश करून एका बैलावर हल्ला केला. या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाल्याने गाव परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गटटेपल्ली गावात प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी मृत बैलाचा पंचनामा करण्यात आला असून वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी परिसराची पाहणी करण्यात आली.
वाघाने गावालगतच्या शेतात येऊन जनावराचा बळी घेतल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या शेतकरी शेतात जाण्यासही धास्तावत असून, वाघाचा बंदोबस्त करून ग्रामस्थांना सुरक्षितता मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
गाव परिसरात वाघाची आणखी काही दिवस हालचाल राहण्याची शक्यता असल्याने वनविभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करणे गरजेचे आहे. वाघाचा तातडीने शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
Tags:
वाघाचा हल्ला