टिपागडच्या कुशीत ‘Trek With MLA’चा जल्लोष; पावसातही युवकांचा उत्साह कायम

टिपागडच्या कुशीत ‘Trek With MLA’चा जल्लोष; पावसातही युवकांचा उत्साह कायम

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या ‘Trek With MLA’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; गडचिरोलीच्या पर्यटनाला नवी दिशा

तालुका प्रतिनिधी – नितेश खोबे

कोरची : गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना व्यापक ओळख मिळवून देण्यासोबतच जिल्ह्याची निसर्गसंपदा, आदिवासी संस्कृती आणि साहसी पर्यटन देशभर पोहोचविण्याच्या उद्देशाने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या संकल्पनेतून टिपागड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘Trek With MLA’ उपक्रमाला गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील युवक, ज्येष्ठ नागरिक, पर्यटक, ट्रेकर्स, बाईक रायडर्स आणि निसर्गप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भाजपा युवा मोर्चा, गडचिरोली आणि Sobay Tourism LLP (TRIBee Tours) यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुसळधार पाऊस, अवघड चढाई आणि प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता सहभागी मोठ्या संख्येने टिपागड येथे दाखल झाले. बाईक राईडनंतर सुरू झालेल्या ट्रेकमध्ये सहभागींचा उत्साह पाहण्यासारखा होता.

‘पाऊस आला... पण उत्साह थांबला नाही!’ या भावनेने सहभागीांनी टिपागडच्या निसर्गरम्य परिसरात साहस, निसर्ग, श्रद्धा आणि आदिवासी संस्कृतीचा अनोखा अनुभव घेतला. पावसातही ट्रेकर्सचा उत्साह कायम राहिल्याने संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

टिपागड हे केवळ निसर्गरम्य पर्यटनस्थळ नसून आदिवासी समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाशी जोडलेले महत्त्वाचे पवित्र स्थान आहे. त्यामुळे टिपागडच्या धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वासोबतच येथील निसर्गसंपदा आणि साहसी पर्यटनाची ओळख व्यापक स्तरावर निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांना राज्य तसेच देशाच्या पर्यटन नकाशावर आणणे, स्थानिक युवकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आदिवासी संस्कृती व परंपरांना व्यापक व्यासपीठ मिळवून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सांगितले.

या उपक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, ज्येष्ठ नेते विजयजी कुमरे, महिला आघाडी जिल्हा महामंत्री लताताई पुंगाटे, गडचिरोली को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक गजाननजी साळवे, भाजपा जिल्हा सचिव सारंगजी साळवे यांच्यासह भाजपा व भाजयुमोचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

गडचिरोली, धानोरा, कुरखेडा व ब्रह्मपुरीसह चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या युवक, ज्येष्ठ नागरिक, पर्यटक, ट्रेकर्स, बाईक रायडर्स आणि निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. उपक्रमाला मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सर्वांचे आभार मानले.

गडचिरोलीच्या पर्यटनाला नवी ओळख देण्यासाठी भविष्यात अशा उपक्रमांचा अधिक व्यापक विस्तार करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
थोडे नवीन जरा जुने