महसूल मंत्री बावनकुळे यांना विश्वस्त मंडळाचे निवेदन; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निधी देण्याचे आश्वासन
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र प्रशांतधाम हनुमान मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी चपराळा हनुमान मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाने केली आहे. यासंदर्भात विश्वस्त मंडळाच्या शिष्टमंडळाने नागपूर येथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ९२ किलोमीटर अंतरावर असलेले चपराळा येथील हनुमान मंदिर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. नद्यांच्या संगमावर निसर्गरम्य आणि जंगलव्याप्त परिसरात वसलेल्या या देवस्थानात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह आंध्र प्रदेश तसेच इतर भागांतूनही मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.
सुविधांचा अभाव; विकासकामांसाठी निधीची गरज
देवस्थान परिसरात भाविकांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव आहे. मंदिर परिसराचा विकास, भाविकांसाठी मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा आणि इतर आवश्यक विकासकामे करण्यासाठी शासनाकडून विशेष निधी उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे विश्वस्त मंडळाने निवेदनातून स्पष्ट केले.
चपराळा हे धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठिकाण असून, शासनाने नियोजनबद्ध पद्धतीने विकास केल्यास या तीर्थक्षेत्राला अधिक चांगले स्वरूप प्राप्त होऊ शकते. त्यामुळे देवस्थानाच्या विकासासाठी निधी मंजूर करून भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विश्वस्त मंडळाने केली.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन
विश्वस्त मंडळाच्या मागणीची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक दखल घेतली. चपराळा देवस्थानाच्या विकासासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय पंदिलवार, सचिव रामचंद्र बामणकर, अंजना दुर्गे, मनोहर बामणकर, दीपक माईरवार, प्रकाश गौडे, भास्कर हुलके, मधुकर धानोरकर, बालाजी चौधरी, सुधाकर बतुलवार, किसन गरपल्लीवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Tags:
मागणी