कोरची-भीमपूर राज्य मार्ग तब्बल सात तास ठप्प, मुसळधार पावसाने नाल्यांना पूर
जितेंद्र सहारे/प्रतिनिधी
कोरची : गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कोरची तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोरची-भीमपूर नाल्याला पूर आला. नाल्याचे पाणी पुलावरून तसेच रस्त्यावरून वाहू लागल्याने कोरची-भीमपूर-बोटेकसा राज्य मार्गावरील वाहतूक तब्बल सात तास ठप्प झाली होती.
कोरची-भीमपूर-बोटेकसा हा महत्त्वाचा राज्य मार्ग असून तो पुढे छत्तीसगड राज्याला जोडला जातो. त्यामुळे या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात हलकी तसेच जड वाहतूक असते. मात्र, मुसळधार पावसामुळे भीमपूर नाल्याच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्याने रस्त्यावरून पाणी वाहू लागले. परिणामी वाहनचालकांना मार्गक्रमण करणे धोकादायक बनले आणि प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद करण्यात आली.
नाल्यावरून पाणी वाहत असताना अनेक वाहनचालक तसेच नागरिकांची मोठी गैरसोय झाली. मार्ग बंद असल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाणी कमी होईपर्यंत वाहनचालकांना मार्गावरच थांबावे लागले.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोरची पोलिसांकडून नाल्याजवळ चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना नागरिकांनी किंवा वाहनचालकांनी जीव धोक्यात घालून पाणी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
सुमारे सात तासांनंतर नाल्याचे पाणी ओसरल्यानंतर कोरची-भीमपूर राज्य मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला.
*गुटेकसा नालाही ओसंडून वाहिला*
दरम्यान, कोरची-बेतकाठी मार्गावरील गुटेकसा नाल्यालाही मुसळधार पावसाचा फटका बसला. पावसामुळे गुटेकसा नाला जवळपास चार तास ओसंडून वाहत होता. नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूकही काही काळ बंद ठेवण्यात आली होती.
मुसळधार पावसामुळे गुटेकसा तसेच भीमपूर नाल्यालगतच्या शेतजमिनींना पाण्याचा फटका बसण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदी-नाले, पूल आणि सखल भागातून प्रवास करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच पाण्याचा प्रवाह सुरू असताना रस्ता ओलांडण्याचा धोका पत्करू नये, असे आवाहन प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Tags:
जितेंद्र सहारे प्रतिनिधी