लॉयड्स हॉस्पिटलमध्ये तिळ्या बाळांचा यशस्वी जन्म; उपसरपंच राकेश कवडो यांच्या पुढाकाराने वैद्यकीय पथकाचा गौरव
उपसरपंच राकेश कवडो यांनी घेतली आईसह तिन्ही बाळांची आस्थेने विचारपूस; दुर्गम भागातील मातांसाठी आरोग्यसेवेचा नवा विश्वास
महाराष्ट्र प्रहार न्यूज
राकेश तेलकुंटलवार उपसंपादक
एटापल्ली : उच्च जोखमीच्या तिळ्या गर्भधारणेचे यशस्वी व्यवस्थापन करत माता शांता गावडे आणि त्यांच्या तिन्ही बाळांना सुखरूप ठेवण्यात हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाला यश आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरसलगोंडी ग्रामपंचायतीच्या वतीने वैद्यकीय पथकाचा गौरव करण्यात आला.
माता शांता गावडे यांच्या तिळ्या गर्भधारणेची माहिती मिळाल्यानंतर लॉयड्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ही गर्भधारणा उच्च जोखमीची असल्याने विशेष काळजी घेत उपचार सुरू केले. प्रसूतीदरम्यान आईसह तिन्ही बाळांच्या आरोग्याची काळजी घेत वैद्यकीय पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने उपचार केले. अखेर आईसह तिन्ही बाळांची सुखरूप प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश आले.
या पार्श्वभूमीवर हेडरीचे उपसरपंच राकेश कवडो आणि ग्रामसेविका कापुरडिया मॅडम यांनी लॉयड्स हॉस्पिटलला भेट देऊन माता शांता गावडे व त्यांच्या तिन्ही बाळांची आस्थेने विचारपूस केली. कुटुंबीयांना शुभेच्छा देत त्यांच्या वतीने गिफ्टही देण्यात आले. उपसरपंच राकेश कवडो यांच्या या पुढाकाराचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
तिळ्या बाळांच्या उच्च जोखमीच्या गर्भधारणेचे यशस्वी व्यवस्थापन करून आईसह तिन्ही बाळांना सुखरूप ठेवण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. मीनाक्षी, डॉ. प्रीती बुर्तिवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. आकांक्ष रेड्डी, स्वाती रेड्डी तसेच भूलतज्ज्ञ डॉ. विवेक आणि डॉ. उमेश उत्तरवार यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पद्मसिंग दुलात, प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन हेडरी यांचीही उपस्थिती होती.
ORW निर्मलांच्या समुपदेशनाने मातेला मिळाला विश्वास
तिळ्या बाळांची उच्च जोखमीची गर्भधारणा असलेल्या माता शांता गावडे सुरुवातीला रुग्णालयात प्रसूती करण्यास तयार नव्हत्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतरही डिस्चार्ज घेऊन घरी जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ही बाब लक्षात आल्यानंतर ORW निर्मला यांनी तब्बल एक तास मातेशी त्यांच्या परिचित भाषेत प्रेमाने व समजुतीने संवाद साधला. रुग्णालयातच प्रसूती करण्याचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले.
निर्मला यांच्या समुपदेशनामुळे मातेला विश्वास वाटला आणि त्यांनी रुग्णालयात प्रसूती करण्यास होकार दिला. त्यानंतर वैद्यकीय पथकाने यशस्वी उपचार करून आईसह तिन्ही बाळांना सुखरूप ठेवले. या संपूर्ण प्रक्रियेत निर्मला यांनी केलेले समुपदेशन मोलाचे ठरले.
दुर्गम भागातील मातांसाठी उच्च जोखमीच्या प्रसूतीचे आव्हान स्वीकारून आई आणि तिन्ही बाळांना सुखरूप ठेवणे ही अत्यंत कौतुकास्पद कामगिरी असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या यशस्वी उपचारामुळे दुर्गम भागातील नागरिकांना अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात लॉयड्स हॉस्पिटलची भूमिका अधोरेखित झाली आहे.