ठाकरीतील रस्ता अडीच वर्षांपासून रखडला; नागरिकांची गैरसोय
विकासासाठी खोदलेला रस्ता ठरला नागरिकांच्या त्रासाचा मार्ग; शाळकरी विद्यार्थी, वृद्धांसह दुचाकीस्वार त्रस्त
चामोर्शी : तालुक्यातील ठाकरी येथील येनय्या वर्धलवार ते आरोग्य उपकेंद्र ठाकरीकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचे नाली व सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम मागील अडीच ते तीन वर्षांपासून रखडल्याने मौजा ठाकरी ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक ३ मधील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याचे खोदकाम करून त्यावर सुमारे १ ते २ ब्रास ८० एमएम रवाळी टाकण्यात आली. मात्र, त्यानंतर पुढील काम पूर्ण करण्यात आले नसल्याने रस्ता अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे नागरिकांना पायी चालताना तसेच दुचाकीने ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पावसाळ्यात या समस्येत आणखी भर पडली आहे. चिखल आणि खडीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह वृद्ध नागरिकांना रस्ता पार करताना त्रास सहन करावा लागत आहे. विकासकामासाठी रस्ता खोदण्यात आला; मात्र तीन वर्षांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण न झाल्याने हा रस्ता नागरिकांसाठी त्रासाचा मार्ग बनला आहे.
पावसाळ्याच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने किमान मुरूम टाकून रस्ता तात्पुरता चालण्यायोग्य करून देणे अपेक्षित होते. मात्र, या रस्त्याकडे संबंधितांचे नियंत्रण व लक्ष नसल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे.
अडीच ते तीन वर्षांपासून रखडलेल्या या कामाची संबंधित यंत्रणेने तातडीने दखल घेऊन नाली व सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करावे. तसेच तोपर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता मुरूम टाकून सुस्थितीत करावा, अशी मागणी वार्ड क्रमांक ३ मधील नागरिकांकडून होत आहे. केवळ आश्वासन न देता प्रशासनाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“रस्ता खोदून खडी टाकल्यानंतर काम पूर्ण झालेले नाही. पावसाळ्यात शाळकरी विद्यार्थी, वृद्ध आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने मुरूम टाकून रस्ता चालण्यायोग्य करावा आणि रखडलेले सिमेंट काँक्रिटचे काम पूर्ण करावे.”
आनंदराव वर्धलवार
— स्थानिक नागरिक, वार्ड क्रमांक ३, ठाकरी
Tags:
समस्या