मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रशासकीय सेवेत जाण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प
एटापल्ली : दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची योग्य दिशा मिळावी आणि प्रशासकीय सेवेत आदिवासी युवक-युवतींचा सहभाग वाढावा, या उद्देशाने आदिवासी विद्यार्थी संघ-विदर्भ, नागपूर (जिल्हा गडचिरोली) यांच्या वतीने भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळा, एटापल्ली येथे १० ते २३ ऑगस्टदरम्यान मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘स्पर्धा परीक्षेची एबीसीडी आणि मी आयएएस अधिकारी होणारच!’ या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित शिबिरात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची प्राथमिक माहिती, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास तसेच परीक्षेतील यशासाठी आवश्यक कौशल्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे, संचालक, मिशन आयएएस अकॅडमी, अमरावती यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता असून योग्य दिशा, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर आयएएससारखे सर्वोच्च ध्येय गाठता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासह स्पर्धा परीक्षांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.
हा उपक्रम आदिवासी विद्यार्थी संघ-विदर्भ, नागपूरचे अध्यक्ष नंदुभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी संभा हिचामी, जनूभाऊ नल्लावार, संजूभाऊ चरडुके, सुगत उराडे, अनिलभाऊ करमरकर, प्रा. बुटे, प्रा. पोटदुखे, नागेश मडावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह, भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी भविष्यात प्रशासकीय सेवेत प्रवेश करून समाजाच्या विकासासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.