येलचील हद्दीत चार ठिकाणी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ५.४० लाखांचा मुद्देमाल नष्ट

येलचील हद्दीत चार ठिकाणी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ५.४० लाखांचा मुद्देमाल नष्ट

अहेरी : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही सुरू असलेल्या अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. येलचील पोलिस मदत केंद्राच्या पथकाने नवेगाव आणि वेलगुर टोला शेतशिवारात चार ठिकाणी छापे टाकून तब्बल ५ हजार ४०० लिटर मोहफुलाचा सडवा नष्ट केला. या कारवाईत अंदाजे ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २० ऑगस्ट रोजी येलचील पोलिस मदत केंद्राच्या पथकाने नवेगाव व वेलगुर टोला परिसरातील शेतशिवारात कारवाई केली. चार वेगवेगळ्या ठिकाणी अवैधरीत्या मोहफुलाची हातभट्टी दारू तयार केली जात असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान पहिल्या ठिकाणी आठ निळ्या प्लास्टिक ड्रममध्ये ८०० लिटर, दुसऱ्या ठिकाणी दहा ड्रममध्ये एक हजार लिटर, तिसऱ्या ठिकाणी दहा ड्रममध्ये दोन हजार लिटर, तर चौथ्या ठिकाणी १६ ड्रममध्ये एक हजार ६०० लिटर असा एकूण ५ हजार ४०० लिटर मोहफुलाचा सडवा आढळून आला. त्याची अंदाजे किंमत ५ लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पंचांसमक्ष कारवाई करून हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, तयार दारू तसेच ड्रममधील मोहफुलाचा सडवा नियमानुसार घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.

या प्रकरणी अहेरी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मारोती लक्ष्मण मोहुर्ले (३५), शंकर नागोराव सोनूले (३८), शंकर बिच्चू आत्राम (२४), तिघेही रा. नवेगाव, ता. अहेरी, तसेच तिरुपती कनकय्या दुलम (४०), रा. वेलगुर, ता. अहेरी, यांच्याविरुद्ध चार स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलिस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. येलचील पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी धनाजी शिंदे, अशोक बांगर यांच्यासह पोलिस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली.

अवैध दारूविरोधात कारवाई सुरूच

जिल्ह्यात दारूबंदी असतानाही चोरीछुप्या पद्धतीने दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार ग्रामीण व दुर्गम भागातही अवैध हातभट्ट्यांवर कारवाई केली जात असल्याने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
थोडे नवीन जरा जुने