एटापल्ली तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आयएएस स्वप्नांना नवी झेप


एटापल्ली तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आयएएस स्वप्नांना नवी झेप

आदिवासी विद्यार्थी संघ-विदर्भ नागपूरतर्फे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

गडचिरोली : दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची दिशा मिळावी आणि प्रशासकीय सेवांमध्ये अधिकाधिक आदिवासी युवक-युवतींनी यश मिळवावे, या उद्देशाने आदिवासी विद्यार्थी संघ-विदर्भ, नागपूर (जिल्हा गडचिरोली) यांच्या वतीने १० ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा एटापल्ली मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले.

"स्पर्धा परीक्षेची A B C D आणि मी आयएएस अधिकारी होणारच!" या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित शिबिरात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची प्राथमिक माहिती, अभ्यासाचे प्रभावी नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे, संचालक, मिशन आयएएस अकॅडमी, अमरावती यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट क्षमता दडलेली असून योग्य दिशा, सातत्य आणि जिद्द यांच्या बळावर आयएएससारखे सर्वोच्च ध्येय गाठणे शक्य असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास आणि स्पर्धा परीक्षांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.

हा उपक्रम आदिवासी विद्यार्थी संघ-विदर्भ, नागपूरचे अध्यक्ष मा. श्री. नंदुभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी संभा हिचामी, जनूभाऊ नल्लावार, संजूभाऊ चरडुके, सुगत उराडे, अनिलभाऊ करमरकर, प्रा. बुटे सर, प्रा. पोटदुखे सर, नागेश मडावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थी, भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारीवर्ग यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिराच्या समारोपप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी भविष्यात प्रशासकीय सेवेत प्रवेश करून समाजाच्या विकासासाठी योगदान देण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.
थोडे नवीन जरा जुने