नशामुक्ती जनजागृती व रुग्णांना फळवाटप
आष्टी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचा सामाजिक उपक्रम
आष्टी, दि. २१ ऑगस्ट २०२६ : महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नशामुक्ती जनजागृती अभियान तसेच वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरीचे सचिव बबलू भैया हकीम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी ग्रामीण रुग्णालय, आष्टी येथे भेट देऊन रुग्णांची आस्थेने विचारपूस केली व त्यांना फळांचे वाटप केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, मानवतावादी दृष्टिकोन आणि समाजसेवेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना नशेचे शरीर, मन, कुटुंब आणि समाजावर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करून नशामुक्त जीवनाचा संदेश देण्यात आला. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व जबाबदार जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुसने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. रवी गजभिये यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.
रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करून वाढदिवसाचा सामाजिक उपक्रमातून साजरा केलेला हा उपक्रम ‘सेवा हीच खरी समाजभक्ती’ या भावनेला अधोरेखित करणारा ठरला. विद्यार्थ्यांच्या मनात समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि संवेदनशीलता वाढविण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
Tags:
जनजागृती