कोरेली खुर्द फाट्यावरील भीषण अपघातानंतर कंकडालवारांची तातडीची धाव; मृताच्या कुटुंबाला मदतीचा हात
एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी; मृतदेह स्वगृही नेण्यासाठी कंकडालवारांनी केली वाहनाची व्यवस्था
अहेरी : कोरेली खुर्द फाट्याजवळ सोमवारी (१७ ऑगस्ट) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वारलू कटिया तलांडी (वय ४९, रा. तुमीरकसा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी तातडीने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत जखमींची भेट घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, तुमीरकसा येथील वारलू कटिया तलांडी हे महरू चिना तलांडी (वय ५४) यांच्यासोबत पेरमिली येथील आठवडी बाजार आटोपून दुचाकीने घरी परतत होते. याचवेळी आलापल्लीच्या दिशेने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या दुसऱ्या दुचाकीवर सुनील देवु लेखामी (वय २८) आणि पवन शामु लेखामी (वय २४), दोघेही रा. मेडपल्ली, ता. भामरागड हे प्रवास करत होते. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच सर्व जखमींना तातडीने पेरमिली आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री सुमारे साडेआठ वाजता चारही जखमींना पुढील उपचारासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान वारलू कटिया तलांडी यांचा मृत्यू झाला. इतर तिघांवर अहेरी येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
जखमींची भेट घेत कंकडालवारांनी दिला मदतीचा शब्द
या घटनेची माहिती मिळताच डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी कोणताही विलंब न करता अहेरी उपजिल्हा रुग्णालय गाठले. त्यांनी जखमींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून जखमींना आवश्यक उपचार मिळत आहेत का, याची माहिती घेतली.
दरम्यान, अपघातात वारलू कटिया तलांडी यांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह तुमीरकसा येथील स्वगृही नेण्यासाठी कुटुंबीयांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली होती. ही बाब कंकडालवार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने चारचाकी वाहनाची व्यवस्था करून दिली. त्यामुळे मृतदेह तुमीरकसा येथे नेणे कुटुंबीयांना शक्य झाले.
शोकाकुल कुटुंबीयांना धीर देताना डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी, “अंत्यसंस्कार आणि तेरवीच्या कार्यक्रमात कोणतीही अडचण आल्यास मला तातडीने कळवा. आम्ही सर्वतोपरी मदत करू,” असा आधार दिला.
या प्रसंगी मेडपल्ली ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश वेलदी, दिवाकर तलांडी, रमेश गावडे, दस्सा तलांडी, मंगेश तलांडी, मरपल्ली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, प्रकाश दुर्गे यांच्यासह आदी उपस्थित होते.
या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत तलांडी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.