भगवंतराव महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ

भगवंतराव महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संधीचे सोनं करावे : प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे

राकेश तेलकुंटलवार उपसंपादक 
एटापल्ली :
आज दिनांक २३/०९/२०२६ रोजी स्थानिक भगवंतराव महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची योग्य दिशा मिळावी आणि त्यांना प्रशासकीय सेवेत जाण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयाच्या वतीने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे हे होते, तर केंद्राचे अधिकृत उद्घाटनही त्यांच्याच हस्ते पार पडले. या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून एटापल्ली पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक कु. पूजा शिर्शिकर उपस्थित होत्या.
 मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक कु. पूजा शिर्शिकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीचे बारकावे समजावून सांगितले. "स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, योग्य नियोजन आणि जिद्द अत्यंत आवश्यक आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास कोणत्याही पार्श्वभूमीचा विद्यार्थी यश संपादन करू शकतो," असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या प्रवासातील अनुभव सांगून प्रेरित केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे यांनी सांगितले की, "स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात जाण्याची गरज भासणार नाही. महाविद्यालयातील या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन, अभ्यास साहित्य आणि योग्य दिशा पुरवली जाईल. विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा पुरेपूर लाभ घेऊन सनदी अधिकारी बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करावे."
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. भारत सोनकांबळे यांनी प्रास्ताविक करताना केंद्र सुरू करण्यामागची भूमिका व आगामी उपक्रमांची माहिती दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत सुरेख व प्रभावी संचालन सह-समन्वयक प्रा. राहुल ढबाले यांनी केले. तर उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. संदिप मैंद यांनी मानले.
या उद्घाटन सोहळ्याला  प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डाॅ. सुधीर भगत, प्रा. डाॅ. बाळकृष्ण कोंगरे, प्रा. डाॅ. विश्वनाथ दरेकार, प्रा डाॅ निलेश दुर्गे, प्रा. डाॅ. राजीव डांगे, प्रा. डॉ. साईनाथ वडस्कर, सहायक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रृती गुब्बावार, सहायक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा चिन्ना पुंगाटी, प्रा. डाॅ. स्वाती तंतरपाळे, प्रा. अतुल बारसागडे, रितेश रामटेके, राहुल नामेवार, बुगावार तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने