महात्मा गांधी जयंतीदिनी शेतकऱ्यांचा ‘सत्याग्रह’; विमानतळाचा शासन आदेश रद्द करण्यासाठी बेमुदत उपोषण
राखी-गुरवळ्यात शेतकऱ्यांचा एल्गार; १२ मेचा वित्तीय व प्रशासकीय मान्यतेचा आदेश रद्द करण्याची मागणी
महेंद्र ब्राम्हणवाडे यांची उपोषणस्थळी भेट; आंदोलनाला जाहीर पाठिंबा
राखी-गुरवळा, दि. २ : महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनीच विमानतळाच्या प्रस्तावाविरोधात शेतकऱ्यांनी ‘सत्याग्रहा’चा मार्ग स्वीकारत बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. प्रस्तावित विमानतळासाठी शासनाने काढलेला १२ मे २०२६ रोजीचा वित्तीय व प्रशासकीय मान्यतेचा शासन आदेश रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने गुरुवारी राखी-गुरवळा येथील आंबेडकर चौक परिसरातील पटांगणात या आंदोलनाला सुरुवात झाली.
विमानतळासाठी प्रस्तावित जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा ठाम विरोध असून, यापूर्वीही निवेदने, आंदोलने आणि शासन-प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, वारंवार विरोध नोंदवूनही शासनाच्या निर्णयात कोणताही बदल झालेला नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
‘जमीन आमची, निर्णयही आमच्या संमतीनेच’
प्रस्तावित विमानतळामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी, शेती आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण होत असल्याने शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन शांततामय आणि लोकशाही मार्गाने सुरू करण्यात आले असून, शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
उपोषणस्थळी भेट देत महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेता शासनाने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यावी. १२ मे २०२६ रोजीचा विमानतळ निर्मितीसंदर्भातील वित्तीय व प्रशासकीय मान्यतेचा शासन आदेश रद्द करून निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
‘दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करणार’
शासनाने आंदोलनाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी दिला.
मोठ्या संख्येने उपस्थिती
उपोषणस्थळी शिवसेना नेते हेमंतभाऊ जंबेवार, रिपब्लिकन पार्टीचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदासजी राऊत, आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्राचार्य प्रकाशजी दुबे, प्राध्यापक राजम बोरकर, वसंत राऊत, राजेश ठाकूर, विजय लाड, दिवाकर निसार, तात्याजी चिचघरे, परीक्षित बांबोळे, धिवरू मेश्राम, हरिजी मडावी, अनिल कोठारे, अरविंद बोदलकर, विकास जेंगठे, स्वप्निल बेहेरे यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, युवक-युवती, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.