सायबर फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नका; विद्यार्थ्यांना पोलिसांचे मार्गदर्शन

सायबर फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नका; विद्यार्थ्यांना पोलिसांचे मार्गदर्शन

जितेंद्र सहारे प्रतिनिधी 

कोरची : मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढत असताना सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, ओटीपी अथवा बँक खात्याची माहिती देणे, बनावट केवायसी कॉलला प्रतिसाद देणे किंवा ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली घाबरवून पैसे उकळणे, अशा प्रकारांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन कोरची पोलिसांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कोरची येथे सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन कोरचीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे व ऑनलाइन फसवणूक प्रतिबंधाबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांविरोधात विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शाळा, महाविद्यालये, बँका तसेच विविध सामाजिक घटकांमध्ये प्रत्यक्ष जनजागृती केली जात आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोरची पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक दीपक डोंब साहेब, पोलीस उपनिरीक्षक मधुकर कदम, पीएसआय सोनाली बल्हाळ तसेच शीतल भलवे, दानिश पठाण, वनिता कोरामी, कुमारशहा काटेंगे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
  यावेळी मार्गदर्शन करताना शीतल भलवे यांनी, आज जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाईल असून त्याच्या माध्यमातून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे सांगितले. सोशल मीडिया, बनावट संदेश, फेक लिंक आणि विविध आमिषांपासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून वैयक्तिक माहिती देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
  पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या स्वरूपावर प्रकाश टाकताना ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. पोलिस, न्यायालय किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा व्हिडिओ कॉलवरून ‘डिजिटल अरेस्ट’ करून पैसे मागत नाही. त्यामुळे अशा धमक्यांना घाबरून पैसे देऊ नयेत, असे त्यांनी सांगितले.
तसेच फेक KYC कॉल, बनावट बँक अधिकारी, लॉटरी अथवा नोकरीचे आमिष, OTP मागणे, बनावट लिंक पाठविणे आणि सोशल मीडिया खात्यांचा गैरवापर अशा विविध सायबर फसवणुकीच्या पद्धतींबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
‘अनोळखी लिंकवर क्लिक नको, OTP कुणालाही सांगू नका आणि बँक खात्याची माहिती शेअर करू नका’ हा सायबर सुरक्षेचा मूलमंत्र विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा, असे पोलिसांनी सांगितले.
सायबर फसवणूक झाल्यास वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा तसेच राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
 तसेच यावेळी दीपक डोंब पो.नि.साहेब यांच्या हस्ते शाळेतवृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही सायबर गुन्ह्यांबाबत विविध प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले. सायबर सुरक्षेबाबत जागरूकता हीच ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाची पहिली पायरी असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
थोडे नवीन जरा जुने