वृक्षारोपणाने एटापल्ली वनपरिक्षेत्रात वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ

एटापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियानानंतर उपस्थित वन अधिकारी-कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक.

वृक्षारोपणाने एटापल्ली वनपरिक्षेत्रात वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ

स्वच्छता अभियानातून वन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश; वन अधिकारी-कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

एटापल्ली | प्रतिनिधी

वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने एटापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वन्यजीव सप्ताहाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. वनपरिक्षेत्र कार्यालयातील काष्ट आगार परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करून सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक डी. जी. रामटेके, पी. डी. देवतळे, पी. बी. कांबळे व सौ. श्रीरामवार यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वनवसाहत एटापल्ली परिसरात श्रमदानातून विशेष स्वच्छता अभियान राबविले. या अभियानात परिसरातील कचरा, प्लास्टिक तसेच अनावश्यक झाडाझुडपे हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छ व पर्यावरणपूरक परिसर निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

वन व पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे. वन्यजीवांचे अधिवास सुरक्षित राहण्यासाठी जंगलांचे संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले.

हा कार्यक्रम भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. निलीमा खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वाखाली पार पडला.

कार्यक्रमास वन विभागातील अधिकारी, कर्मचारी, वनमजूर तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून वन्यजीव सप्ताहाची सुरुवात पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारी ठरली.


थोडे नवीन जरा जुने