झाडीपट्टी रंगभूमी सज्ज :
तालमींना आला वेग
नव्या संहिता आगामी नाट्यप्रयोग
ज्ञानेश्वर नाट्य मंडळाचा शुभारंभाचा प्रयोग पाच ऑक्टोबरला गुरनोलीत
प्रा. राजकुमार मुसणे,
गडचिरोली - चंद्रपूर गडचिरोली भंडारा, गोंदिया या भागात लोकप्रिय असलेली ग्रामीण लोकजीवनाशी निगडित रंगभूमी म्हणजेच झाडीपट्टी रंगभूमी.
झाडीपट्टीची रंगभूमी म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हे, तर ग्रामीण जीवनाचा आरसा, लोकसंस्कृतीचा आविष्कार आणि सामान्य माणसाच्या सुख-दुःखांना अभिव्यक्त करणारे प्रभावी माध्यम होय. परिसरातील जनमानसाशी घट्ट नाळ जोडलेली झाडीपट्टी रंगभूमी आजही आपल्या समृद्ध परंपरेचा वारसा जपत नव्या नाट्यपर्वाच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. झाडीपट्टी रंगभूमीवर नव्या नाटकांची चाहूलीबरोबरच तालमींचा श्रीगणेशा झाला आहे.झाडीपट्टीतील आगामी नाट्यहंगामाच्या पार्श्वभूमीवर व नाटकांच्या तालमीने रंगकर्मींच्या हालचालींना वेग आला आहे .प्रेक्षकांना नव्या पर्वाची प्रतीक्षा आहे.
दरवर्षी हजारो प्रयोगाच्या माध्यमातून करोडोची उलाढाल करणाऱ्या या रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयावरील नाटके सादर होऊन रसिक प्रेक्षकांचे रंजन व प्रबोधन केले जाते. या नवीन २०२६-२७ सत्रासाठी झाडीपट्टीतील विविध नोंदणीकृत पंचेचाळीस व्यावसायिक नाट्यमंडळे व इतर हौशी असे सुमारे साठ नाट्यमंडळे नवीन नाटके सादर करण्यासाठी सज्ज झाली आहेत. या सिझनमध्ये कुही, भंडारा भागात प्रादेशिक स्तरावरही नाट्यमंडळचा उगम होताना दिसतो आहे. निर्मात्यांनी कलावंतांना एकत्र बोलावून संहितावाचन व तालमीना वेग आला आहे. बहुतेक नाट्य मंडळाच्या तालमी वेगात सुरूच आहेत. आधुनिक मल्टीमीडियाच्या वेगवान बदलामुळे रसिक प्रेक्षकांच्या अभिरुचीतही बदल होत असल्याने नाट्यमंडळातील स्पर्धा प्रचंड वाढली आहे. झाडीपट्टीची नाट्य पंढरी वडसा येथे नाटकाच्या बुकिंग करिता विविध प्रेसचे कार्यालये बहरात सज्ज झाले आहेत. वेगवेगळ्या गावातील आयोजक नाट्यरसिक नाटक बुक करण्याकरिता वडसा येथे येत आहेत. सोयीची नाट्यप्रयोगाची तारीख मिळावी यासाठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू आहे.
प्रत्येक नाट्य मंडळ आपलं नाटक कसदार आणि प्रयोग कसा दमदार होईल यासाठी परिश्रम घेत आहेत. रसिक प्रेक्षकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन निर्माता व दिग्दर्शक नाटक बसविण्यासाठी प्रयासाने तालीम घेत आहेत. नुकतेच आशीष खुणे यांच्या ज्ञानेश्वर नाट्यमंडळांचे व्यंकटेश नुरचलवार लिखित हत्याकांड हे आदिवासी जीवनातील अत्याचाराचे दर्शन घडविणारे नव्याकोऱ्या नाटकाची तालीम पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या मार्गदर्शनात ज्येष्ठ रंगकर्मी अशोक दूधकवर यांच्या दिग्दर्शनात गुरनोली येथे सुरू आहे.अशोक दूधकुवर,विलास वट्टी,रुपेश ढोले, पी लालचंद, विलास पेंटर, स्वर. आशिक राऊत,नैना खोब्रागडे,सविता भोयर,टीना उराडे,वैशाली हे कलावंत तथा ऑर्गन राहुल सहारे, तबला उमा वाढई, अँक्टोपॅड अखिल गेडाम या संगीतकारांच्या एकूणच संचात हत्याकांड या नाटकाची तालीम सुरू आहे.सध्या सुरू असलेल्या तालमी म्हणजे आगामी नाट्यहंगामाची नांदी आहे.नाटक प्रत्यक्ष रंगमंचावर सादर होण्यापूर्वी त्याच्या निर्मितीची एक स्वतंत्र प्रक्रिया असते. नाटकाची संहिता निवडणे, पात्रांची निवड करणे, कलाकारांचे वाचन, संवादांची उजळणी, प्रसंगांची मांडणी, दिग्दर्शकीय दृष्टिकोन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आणि रंगभूषा अशा अनेक टप्प्यांतून नाटक आकार घेत असते. सध्या झाडीपट्टीतील विविध नाट्यसंस्थांमध्ये याच प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.तालमीच्या जागी कलाकारांच्या संवादांचा आवाज घुमू लागला आहे. कुठे गंभीर प्रसंगांची तर कुठे विनोदी संवादांवर रंगकर्मी मेहनत घेत आहेत. एखाद्या प्रसंगातील भावनिक चढ-उतार, संवादफेकीतील अचूकता, पात्राच्या स्वभावानुसार देहबोली आणि प्रसंगानुरूप अभिनय यांचा कस तालमीच्या माध्यमातून लागत असतो. कलाकारांच्या या मेहनतीतूनच पुढे प्रेक्षकांना अविस्मरणीय कलात्मक नाट्यानुभव मिळत असतो.
निर्मात्याचा प्रयास ,कलाकारांची धडपड, दिग्दर्शकांचे नियोजन, लेखकाच्या शब्दांना मिळणारा अभिनयाचा साज आणि तंत्रज्ञांची मेहनत या सर्वांचा संगम लवकरच रंगमंचावर अनुभवायला मिळणार आहे. आगामी काळात झाडीपट्टीच्या विविध नाट्यमंडळाकडून कोणती नवी नाटके सादर होतात, कोणते विषय रंगमंचावर येतात आणि प्रेक्षकांचा त्यांना कसा प्रतिसाद मिळतो, याकडे नाट्यरसिकांचे लक्ष लागले आहे .
झाडीपट्टी रंगभूमीवर या नव्या सीझनमध्ये येणारी आगामी नाटके पुढील प्रमाणे आहेत.
शृंगार नाट्य मंडळाचे संजय ठवरे लिखित
चिखलातील दगड -, गुरुदेव रंगभूमीचे निखिल मानकर लिखित म्होरक्या , धनंजय रंगभूमीचे प्रा. धनंजय ढवळे लिखित कोण नाही कोणाचा, रंगतरंग थिटर्सचे आनंद भिमटे लिखित हंबरडा, गायत्री रंगभूमीचे मुकेश गेडाम लिखित नरकवास आणि सिनेस्टार देवेंद्र दोडके लिखित जल्लाद, शिवचंद्र रंगभूमीचे शिल्पा पाटील लिखित फुलवा: एक वीरांगना ,व्यंकटेश्वरा नाट्य मंडळाचे विश्वनाथ मुळे लिखित प्रतिशोध आणि वरात घुसली घरात,कलाधिपती रंगभूमीचे अमर मसराम लिखित मालकीण ,झाडीपट्टी रंगमंचचे निर्मल टेंभुर्णे लिखित बाईसाहेब , तांडा ,शिवराज नाट्य मंडळाचे पंकेश मडावी लिखित देवाघरचा अंधार, युवा रंगमंचाचे युवराज प्रधान लिखित कुलकलंक , एकता रंगभूमीचे लेखाराम हुलके लिखित तुफान , डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्या लोकजागृती नाट्य मंडळाचे राजीवकुमार लिखित' बायको माझी नवसाची ,नाट्यश्रीचे ईश्वर धकाते लिखित वणवा, चंद्रकमल थिएटरचे के.आत्माराम, लिखित अनाथ , नाट्य नरेश रंगभूमीचे प्रकाश प्रधान लिखित भडका, चेताक्ष रंगभूमीचे संतोष कवठे लिखित रुबाब,परमानंद गहाणे लिखित कलादर्पणचे उध्वस्त आयुष्य,ज्ञानेश्वर नाट्य रंगभूमीचे मंगेश नरचूलवार, लिखित आदिवासी मुलीवरील अत्याचाराचे हत्याकांड नाटक याशिवाय अन्य नाट्य मंडळाचे ही आगामी नाटके रंगभूमीवर सादर होणार आहेत. या सीझनमध्ये असलेली झाडीपट्टी रंगभूमीची ही नवीन संहिता, नाट्याशयची आगामी नाटके पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. नाटकातील विषय काय आहेत, ते प्रेक्षकांच्या पसंतीला कितपत उतरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
अनेक नाट्यमंडळातील कलाकारांची ही अदलाबदली झालेली आहे, त्यामुळे नवीन कलाकाराच्या संचात नाटक बसविण्याचे जिकीरीचे काम दिग्दर्शकाला करावे लागत आहे. विविध असोसिएशनने घेतलेल्या बैठकां आणि प्रत्येकांचे दर वाढल्यामुळे प्रयोगखर्च याबाबत निर्मातेही संभ्रमित आहेत. अनेक वर्षापासून सीमित असलेला तिकीट दर, कलावंतांची वाढते मानधन, वाहतूक खर्च साऊंड खर्च, आयोजकांना उद्भवणारा नैमित्तिक खर्च या सर्व बाबींच्या अनुषंगाने कसरतच आहे.
बदलत्या जीवनशैलीच्या , मूल्याच्या मल्टिमीडियाच्या काळात झाडीपट्टीची सांस्कृतिक ओळख जपण्याचे आव्हानही आहे.झाडीपट्टी रंगभूमीवरील आगामी नाट्यहंगाम हा नाटककारांच्या नव्या विचारांचा,कलाकारांच्या नव्या स्वप्नांचा, आणि प्रेक्षकांच्या नव्या अपेक्षांचा उत्सव ठरो! रंगभूमीचा पडदा उघडण्यापूर्वी सुरू झालेली ही तयारी झाडीपट्टीच्या सांस्कृतिक विश्वाला नवी ऊर्जा देणारी ठरावी, हीच अपेक्षा!
प्रा. राजकुमार मुसणे,गडचिरोली
९४२३६३९५३२
Tags:
नाट्यप्रयोग