शिवाजी हायस्कूलच्या मुलींच्या क्रिकेट संघाची विभाग स्तरावर झेप
जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक; १७ वर्षे वयोगटातील संघाचे दमदार यश
तालुका प्रतिनिधी चामोर्शी:-
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत शिवाजी हायस्कूल, चामोर्शी येथील १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या शानदार विजयासह शिवाजी हायस्कूलच्या मुलींच्या संघाने आता विभागस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवत पुढील वाटचालीसाठी झेप घेतली आहे.
या स्पर्धेत शिवाजी हायस्कूलच्या खेळाडूंनी सांघिक एकजूट, उत्कृष्ट फलंदाजी, प्रभावी गोलंदाजी तसेच भक्कम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी आत्मविश्वास, शिस्त आणि जिद्दीचे दर्शन घडवत आपल्या संघाचे व विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
या विजयी संघात परी उंदीरवाडे, श्रेया बुरे, अक्षरा एलमुले, अनुष्का बारसागडे, सिद्धी जुवारे, स्वरा येलेकर, अरविना बानोत, पल्लवी देवगिरकर, संस्कृती बंडावार, गौरी भिरकुंडवार, दिव्या जाधव आणि प्रतीक्षा जाधव या विद्यार्थिनींचा सहभाग होता. सर्व खेळाडूंनी संघभावनेने खेळ करत स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावली.
संघाच्या या यशाबद्दल शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य धनेंद्र चौधरी आणि उपप्राचार्य शाम भरे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच विभागस्तरीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा देत आगामी सामन्यांमध्येही अशीच उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचा लौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक राकेश खेवले, मार्गदर्शक धनराज चंदनखेडे, विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, पालक मनीष उंदीरवाडे तसेच प्रशिक्षक शेंडे उपस्थित होते. त्यांनीही विजयी संघातील सर्व खेळाडूंचे कौतुक करून पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवाजी हायस्कूलच्या मुलींच्या क्रिकेट संघाने मिळवलेले हे यश विद्यालयातील क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असून, या विजयामुळे चामोर्शी तालुक्यातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विभागस्तरीय स्पर्धेतही शिवाजी हायस्कूलचा संघ चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
Tags:
शिक्षण विभाग