चामोर्शीतील लालडोंगरी व मटन मार्केट परिसरातील गरिबांना घरकुल द्या
शिवसेना तालुकाप्रमुख पप्पीभाऊ पठाण यांची मागणी
तालुका प्रतिनिधी चामोर्शी :- चामोर्शी शहरातील प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत लालडोंगरी तसेच मटन मार्केट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) चामोर्शी तालुकाप्रमुख पप्पीभाऊ पठाण यांनी केली आहे.
लालडोंगरी व मटन मार्केट परिसरात अनेक कुटुंबे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असून, आजही काही कुटुंबांना झोपड्यांमध्ये किंवा अपुऱ्या निवाऱ्यात राहावे लागत आहे. पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरणे, उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास तसेच हिवाळ्यात थंडीचा सामना करावा लागत असल्याने या कुटुंबांचे दैनंदिन जीवन मोठ्या अडचणींचे बनले आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनाही अशा असुरक्षित निवाऱ्यात राहण्याची वेळ येत असल्याचे पठाण यांनी म्हटले आहे.
शासनाकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांसाठी विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, प्रभाग क्रमांक ५ मधील लालडोंगरी आणि मटन मार्केट परिसरातील काही पात्र कुटुंबांना अद्याप या योजनांचा लाभ मिळालेला नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे संबंधित विभाग तसेच चामोर्शी नगरपंचायतीने या परिसरातील घरकुलापासून वंचित असलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण व प्रत्यक्ष चौकशी करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पात्र लाभार्थ्यांची तातडीने चौकशी करून त्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच घरकुल योजनेच्या निकषांनुसार पात्र असलेल्या एकाही गरीब कुटुंबाला केवळ कागदोपत्री प्रक्रियेमुळे योजनेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असे पप्पीभाऊ पठाण यांनी सांगितले.
दीर्घकाळापासून या परिसरात वास्तव्यास असलेल्या गरजू कुटुंबांना कायमस्वरूपी व सुरक्षित निवारा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन व संबंधित विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लालडोंगरी व मटन मार्केट परिसरातील पात्र गरिबांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख पप्पीभाऊ पठाण यांनी केली आहे.