ग्रामस्थांच्या एकजुटीने दारूला गावाबाहेरचा रस्ता

ग्रामस्थांच्या एकजुटीने दारूला गावाबाहेरचा रस्ता

दिनाचेरपल्लीमध्ये दोन वर्षांपासून दारूबंदी; शेजारील गावांमध्येही जनजागृतीचा प्रयत्न

अहेरी : ग्रामस्थांची एकजूट आणि सामूहिक निर्णयातून गावात सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणता येतो, याचा आदर्श अहेरी तालुक्यातील दिनाचेरपल्ली गावाने घालून दिला आहे. महागाव खुर्द ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या या गावात ग्रामस्थांनी एकत्र येत घरगुती दारू गाळणे आणि अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला आता दोन वर्षे पूर्ण झाली असून, गावातील दारूबंदी आजही कायम आहे.

दिनाचेरपल्ली येथे प्रामुख्याने आदिवासी समाजाची वस्ती आहे. काही वर्षांपूर्वी गावात दारूच्या व्यसनाचे प्रमाण वाढल्याने त्याचा सामाजिक जीवनावर परिणाम होत होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेत ग्रामस्थांना एकत्र केले.

गावात घरगुती दारू गाळणे तसेच अवैध दारूविक्री बंद करण्याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने गावात दारूबंदीचा सामूहिक निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केल्याने गेल्या दोन वर्षांपासून गावात दारूविक्री आणि घरगुती दारू गाळण्याला आळा बसला आहे.

आदिवासी संस्कृतीतील धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचा विचार करून, अशा प्रसंगी आवश्यक तेवढ्याच प्रमाणात आणि ठराविक व्यक्तींकडूनच दारूचा वापर करण्याबाबत स्थानिक पातळीवर नियम निश्चित करण्यात आले आहेत.

दरम्यान, मुक्तिपथच्या संघटन भेट उपक्रमातून गावातील सक्रिय युवकांची संघटनाही गठित करण्यात आली आहे. या माध्यमातून दारूबंदी कायम ठेवण्यासोबतच सामाजिक जनजागृतीवर भर दिला जात आहे. दिनाचेरपल्ली येथील ग्रामस्थांनी शेजारील दिनाचेरपल्ली टोला आणि गोटुलगुडम या गावांमध्येही दारूविक्री बंद करण्यासाठी जनजागृती आणि सहकार्याची भूमिका घेतली आहे.

या सामाजिक परिवर्तनासाठी रेणुका इष्टाम, शालिकराव दब्बा, महेश इष्टाम, पंचफुला आलाम आणि मुक्तिपथच्या नंदिनी आशा यांचे सहकार्य लाभले. ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे दोन वर्षांपासून कायम असलेली दारूबंदी ही गावाच्या सामाजिक एकजुटीचे उदाहरण ठरत आहे.
थोडे नवीन जरा जुने