जैरामपूर ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभाराची माहिती मागितली
ग्रामसभेत उपस्थित प्रश्नांबाबत चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची पंचायत समितीकडे मागणी
चामोर्शी : प्रतिनिधी चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षांतील कामकाज, विकासकामे आणि आर्थिक व्यवहाराबाबत आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून संबंधित बाबींची प्रशासकीय स्तरावर पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षांतील कामकाज व खर्चासंदर्भात नागरिकांकडून माहिती जाणून घेण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भातील आवश्यक माहिती स्पष्टपणे उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता राहावी आणि ग्रामसभेत नागरिकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना नियमांनुसार योग्य माहिती मिळावी, यासाठी संबंधित कागदपत्रे व नोंदींची प्रशासकीय स्तरावर तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.
“ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असून, संबंधित बाबींची अधिकृत चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी,” अशी मागणी वैभव गौरकार यांच्यासह निवेदनकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, या निवेदनाच्या अनुषंगाने पंचायत समिती प्रशासनाकडून चौकशी किंवा कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच संबंधित बाबींची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन काय कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Tags:
ग्रामपंचायत