टाकी उभी, पण नळ कोरडे! चापलवाड्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

टाकी उभी, पण नळ कोरडे! चापलवाड्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

तीन-चार वर्षांपासून पाणीपुरवठा योजना बंद; योजना तातडीने सुरू करण्याची प्रणय खुणे यांची मागणी

चामोर्शी, २२ सप्टेंबर : तालुक्यातील चापलवाडा येथे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून, गेल्या तीन-चार वर्षांपासून बंद असलेली पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केली आहे. पाणीपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेली टाकी वापराविना असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील चापलवाडा येथे डॉ. प्रणय खुणे यांनी सदिच्छा भेट देऊन ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी गावातील विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

गावातील पाणीपुरवठा योजना गेल्या तीन-चार वर्षांपासून बंद असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेली पाण्याची टाकी वापराविना असल्याची स्थिती असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे बंद योजना तातडीने कार्यान्वित करून नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

शाळेच्या सुविधांकडेही लक्ष देण्याची मागणी

पाणीपुरवठ्यासोबतच गावातील शाळेच्या विविध प्रश्नांकडेही ग्रामस्थांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती करावी, पदवीधर भाषा शिक्षक उपलब्ध करून द्यावा, शाळेच्या इमारतीची दुरुस्ती अथवा नवीन इमारत उभारावी, शौचालय व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

तसेच गावासाठी नियमित बससेवा सुरू करावी आणि परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांवर शासनस्तरावर पाठपुरावा करून संबंधित समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन डॉ. प्रणय खुणे यांनी दिले.

यावेळी रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू उपाध्ये, घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार, भाजपा नेते विकास मैत्र, वरफडे गुरुजी, संदीप भोवरे, विलास सावकार वडेट्टीवार, मेकेलवार, गुरुदास पालकवार, गर्तुलवार, मिलन विश्वास, उसन रामटेके, सत्यवान टंटकवार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने