उदापूर येथील प्राचीन वास्तूस्थळाच्या पाहणीसाठी संशोधन पथक येणार

 ‌‌                       (ए आय फोटो)

उदापूर येथील प्राचीन वास्तूस्थळाच्या पाहणीसाठी संशोधन पथक येणार

२६ सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम; धम्म बांधवांना उपस्थित राहण्याचे प्रा. मुनिश्वर बोरकर यांचे आवाहन

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहराजवळ आरमोरी मुख्य मार्गालगत उदापूर येथे प्राचीन बौद्ध वास्तूस्थळ असल्याचा दावा करण्यात आला असून, या स्थळाची पाहणी व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संशोधन पथक उदापूर येथे येणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी भाद्रपद पौर्णिमेनिमित्त उदापूर येथील स्थळावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्राचीन बौद्ध इतिहासस्थळ शोध मोहिमेच्या माध्यमातून या स्थळाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सदर स्थळाचे ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्वरूप निश्चित करण्यासाठी पुढील संशोधन व अभ्यासाची आवश्यकता असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

२६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता आयोजित कार्यक्रमास सत्यशोधक नागमित्र धर्मेश पाटील, नागपूर व त्यांची संशोधन टीम तसेच भन्ते ज्ञानज्योती, चिमूर यांच्यासह भन्तेगण उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

उदापूर येथील या प्राचीन वास्तूस्थळाची शासकीय स्तरावरही पाहणी व आवश्यक संशोधन व्हावे, तसेच स्थळाचे महत्त्व स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

कार्यक्रमासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील धम्म बांधवांनी शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धम्मबंधू प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली, डॉक्टर गोपाल रायपूरे चंद्रपूर, सामाजिक कार्यकर्त्या सुशीला भगत आल्लापल्ली, प्रज्ञा निमगडे आरमोरी यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने