सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावावी ,महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात सायबर सुरक्षा विषयावर मार्गदर्शन
आष्टी, दि. 23 सप्टेंबर 2026 : डिजिटल युगात सायबर सुरक्षेबाबत प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक असून विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेचे स्वयंसेवक म्हणून कार्य करावे. स्वतः जागरूक राहून आपल्या कुटुंबीयांसह नातेवाईक आणि गावातील नागरिकांमध्येही सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी, असे प्रतिपादन मा. संजय त्रिपाठी सर (समन्वयक, पोलीस तुरुंग, फॉरेन्सिक व अभियोजन, महाराष्ट्र राज्य) यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. 23 सप्टेंबर रोजी सायबर सुरक्षा विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय त्रिपाठी यांनी मोबाईल व इंटरनेटचा वापर आवश्यकतेनुसार आणि जबाबदारीने करण्याचे आवाहन केले. ऑनलाइन व्यवहार, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा वापर करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुसने सर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून मा. गजानन जाधव (जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली), डॉ. तुला (भगवंतराव महाविद्यालय, सिरोंचा), डॉ. संजय फुलझेले, डॉ. खुने, डॉ. शास्त्रकार, डॉ. पांडे व प्रा. नगराडे मॅडम तसेच मा. गणेश शिंगाडे (पत्रकार, आष्टी) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रवी गजभिये यांनी सायबर सुरक्षेच्या जनजागृतीची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बोभाटे यांनी केले, तर आभार मा. जाधव सर यांनी मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.