पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सेतू अभियान यशस्वी करण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सेतू अभियान यशस्वी करण्याचे आवाहन

तालुका प्रतिनिधी चामोर्शी :- पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्यात ‘सेवा सेतू’ अभियान प्रभावीपणे व यशस्वीरित्या राबविण्यात यावे, तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती व लाभ पोहोचविण्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा सेवा सेतू अभियानाचे जिल्हाप्रमुख सुरेश शहा यांनी जिल्ह्यातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सेवा सेतू अभियानाच्या माध्यमातून केंद्र शासन व राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. अनेक पात्र लाभार्थींना शासनाच्या योजनांची पुरेशी माहिती नसल्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात. अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांना संबंधित योजनांची माहिती देणे, अर्ज प्रक्रिया समजावून सांगणे तसेच शक्य तेथे त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे शहा यांनी सांगितले.
यासोबतच तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात’ भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे. या अभियानाचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या विविध प्रशासकीय व शासकीय कामांमध्ये आवश्यक ती मदत करावी, असेही आवाहन त्यांनी केले.
सेवा सेतू अभियान हे केवळ एक कार्यक्रम न राहता नागरिक आणि शासन यांच्यातील दुवा मजबूत करणारे अभियान ठरावे, यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. गावपातळीपासून तालुकास्तरापर्यंत नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ पात्र व्यक्तींना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सुरेश शहा यांनी स्पष्ट केले.
“समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याला शासनाच्या योजनांची माहिती देणे आणि त्याचा हक्काचा लाभ मिळवून देणे, हीच खरी जनसेवा आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांना मदत करता आली, तर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने जनसेवेच्या माध्यमातून साजरा केल्याचे समाधान मिळेल,” असे मत सुरेश शहा यांनी व्यक्त केले.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात कोणत्या तारखेला सेवा सेतू अभियान व संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, याचे संपूर्ण नियोजन लवकरच करण्यात येणार असून त्याची माहिती सर्व तालुकाध्यक्ष तसेच सेवा सेतू अभियानाचे तालुकाप्रमुख यांना पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने अभियानात सहभागी होऊन ते यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अभियान प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावा, असेही सुरेश शहा यांनी यावेळी सांगितले.
थोडे नवीन जरा जुने