फॅन्सी ड्रेसमधून पर्यावरण, वन्यजीव संवर्धनाचा संदेश


फॅन्सी ड्रेसमधून पर्यावरण, वन्यजीव संवर्धनाचा संदेश

गणेशोत्सवानिमित्त एटापल्लीत विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; देशप्रेमासह जल-जंगल-जमिनीच्या संवर्धनावर जनजागृती

राकेश तेलकुंटलवार उपसंपादक 

एटापल्ली : गणेशोत्सवानिमित्त वन वसाहत, एटापल्ली येथे विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील वेशभूषा साकारत पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण, जल-जंगल-जमीन तसेच क्रांतीवीर बिरसा मुंडा यांसारख्या विषयांवर सामाजिक व पर्यावरणपूरक संदेश दिला.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा, प्रभावी सादरीकरण आणि विषयाची मांडणी याच्या माध्यमातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः वन्यजीव संवर्धन, जल-जंगल-जमीन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांनी दिलेल्या संदेशाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी भगवंतराव महाविद्यालय, एटापल्ली येथील प्राध्यापिका श्रीमती स्वाती तंतरपाळे व गुडवार मॅडम परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र अधिकारी निलिमा खोंब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी क्षेत्र सहाय्यक बी.डी. नागोसे व बी.डी. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस.डी. अडगोपुलवार यांनी केले.

गणेशोत्सवातील या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबतच पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य झाले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी एटापल्ली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री मच्छिंद्र नागरगोजे यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, पालक, वन कर्मचारी, अधिकारी व नागरिकांनी भक्तिभावाने आरतीत सहभाग घेतला.

वनपरिक्षेत्र कार्यालय एटापल्ली येथील सर्व वनकर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि उपस्थितांचा मिळालेला प्रतिसाद यामुळे फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

थोडे नवीन जरा जुने