तालुक्याची मागणी करणारी गावे ‘अपर तहसील’च्या यादीबाहेर!

तालुक्याची मागणी करणारी गावे ‘अपर तहसील’च्या यादीबाहेर!

कमलापूर, आष्टी, जारावंडीसह प्रमुख गावांमध्ये अपेक्षा कायम; सहा ठिकाणी नवीन कार्यालयांना मंजुरी

गडचिरोली : जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज नागरिकांच्या जवळ आणण्याच्या उद्देशाने महसूल विभागाने सहा तालुक्यांमध्ये नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार कुरखेडा, आरमोरी, धानोरा, सिरोंचा, एटापल्ली आणि अहेरी तालुक्यांतील सहा ठिकाणी ही कार्यालये सुरू होणार आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून स्वतंत्र तालुक्याच्या दर्जाची मागणी होत असलेल्या कमलापूर, आष्टी, घोट, जारावंडी आणि बिनगुंडा यांसारख्या गावांचा या यादीत समावेश झालेला नसल्याने स्थानिक पातळीवर या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.

कुरखेडा तालुक्यात मालेवाडा, आरमोरी तालुक्यात वैरागड, धानोरा तालुक्यात पेंढरी, सिरोंचा तालुक्यात आसरअल्ली, एटापल्ली तालुक्यात कसनसूर आणि अहेरी तालुक्यात येथे अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत.

नवीन कार्यालयांमुळे संबंधित परिसरातील नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी मुख्य तहसील कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी होण्याची अपेक्षा आहे. सातबारा, फेरफार तसेच विविध महसुली दाखले आणि इतर कामकाज स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

दरम्यान, चामोर्शी तालुक्यातील आष्टी व घोट, सिरोंचा तालुक्यातील झिंगाणूर, एटापल्ली तालुक्यातील जारावंडी आणि अहेरी तालुक्यातील कमलापूर यांना तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी यापूर्वीपासून होत आहे. तसेच पुराडा परिसरातूनही अपर तहसील कार्यालयाची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आगामी काळात या भागातील नागरिकांच्या मागण्यांबाबत शासन कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

सहा ठिकाणी होणार अपर तहसील कार्यालये

मालेवाडा | वैरागड | पेंढरी | आसरअल्ली | कसनसूर | जिमलगट्टा 

नवीन कार्यालयांसाठी तात्पुरती जागा निश्चित करून आवश्यक मनुष्यबळ व कार्यालयीन व्यवस्था उपलब्ध करण्याच्या सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.
थोडे नवीन जरा जुने