अनखोड्यात महिलांचा दारूबंदीचा एल्गार; ३,७५० रुपयांची ताडी जप्त

                         (ए आय फोटो)

अनखोड्यात महिलांचा दारूबंदीचा एल्गार; ३,७५० रुपयांची ताडी जप्त

तीन पोती ताडी पंचांसमक्ष नष्ट; आष्टी परिसरातील गावांनीही दारूबंदी मोहिमेत पुढाकार घेण्याचे आवाहन

 चामोर्शी/ तालुक्यातील अनखोडा गावातील अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला असून, अनखोडा येथे ताडी विक्रीविरोधात दारूबंदी समितीच्या महिलांनी कारवाई केली. महिलांनी ताडी जप्त करून ती पोलिसांच्या ताब्यात दिली. या कारवाईत सुमारे ३ हजार ७५० रुपये किमतीची प्लास्टिकच्या बाटल्या तीन पोती ताडी जप्त करण्यात आली.

अनखोडा गावात ताडी विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दारूबंदी समितीच्या महिलांनी एकत्र येत संबंधित प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. पोलिसांच्या उपस्थितीत व पंचांसमक्ष जप्त केलेल्या ताडीचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर जप्त ताडी नष्ट करण्यात आली.

गावात दारूबंदी प्रभावीपणे राबविण्यासाठी महिलांकडून गेल्या काही काळापासून सातत्याने जनजागृती व पाठपुरावा केला जात आहे. महिलांच्या या पुढाकारामुळे गावातील दारूविक्रीला आळा घालण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे.

आष्टी परिसरातील गावांनीही घ्यावा पुढाकार

अनखोडा येथील महिलांच्या पुढाकाराप्रमाणेच आष्टी, इल्लूर आणि मार्कंडा (कं) सह आष्टी परीसरातील तंटामुक्त गाव समिती तसेच दारूबंदी समितीच्या महिलांनीही गावातील अवैध दारूविक्रीविरोधात पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गावपातळीवर महिलांनी संघटितपणे व्यसनविरोधी जनजागृती केल्यास दारूच्या व्यसनामुळे निर्माण होणाऱ्या कौटुंबिक समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते. तसेच तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठीही अशा उपक्रमांचा उपयोग होऊ शकतो.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत 

महिलांनी दाखविलेल्या या पुढाकारामुळे गावातील दारूबंदी मोहिमेला बळ मिळाले असून, व्यसनमुक्तीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.
थोडे नवीन जरा जुने