५७ नागरिकांची आरोग्य तपासणी; जय चवडेश्वरी गणेश मंडळाचा सामाजिक उपक्रम

५७ नागरिकांची आरोग्य तपासणी; जय चवडेश्वरी गणेश मंडळाचा सामाजिक उपक्रम

तालुका प्रतिनिधी 
चामोर्शी : - तेलंग मोहल्ला, चामोर्शी येथील जय चवडेश्वरी गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील तब्बल ५७ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
नागरिकांच्या आरोग्याची नियमित तपासणी व्हावी तसेच विविध आजारांचे प्राथमिक स्तरावर निदान होऊन त्यावर वेळीच उपचार घेता यावेत, या उद्देशाने या आरोग्य तपासणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिबिरादरम्यान नागरिकांची आरोग्यविषयक तपासणी करून आवश्यक त्या आरोग्यविषयक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.
या आरोग्य तपासणी उपक्रमासाठी डॉ. रुपाली लांडगे, आरोग्य सेविका ताईबाई उईके, तुषार मंगर तसेच पीतांबर आत्राम, सपना येरमे आणि सांगिता बन्सोड यांनी सहकार्य केले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपस्थित नागरिकांची तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत आवश्यक मार्गदर्शन केले.
हा उपक्रम मंडळाचे अध्यक्ष साहिल पेशटीवार, उपाध्यक्ष श्रावण चौधरी आणि सचिव अभिषेक कोत्तावार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मंडळाचा प्रयत्न असून, नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
जय चवडेश्वरी गणेश मंडळाच्या या सामाजिक उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून, भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
थोडे नवीन जरा जुने