रामपूर हादरले! ५४ वर्षीय इसमाचा गळफासाने मृत्यू
पहाटे घरातील मधल्या खोलीत आढळला मृतदेह; आष्टी पोलिसांकडून पंचनामा, कारण अद्याप अस्पष्ट
आष्टी (अशोक खंडा: चामोर्शी तालुक्यातील रामपूर (कढोली) येथे ५४ वर्षीय इसमाचा गळफासाने मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, दि. २५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे रामपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतकाचे नाव भाऊजी सलामे (वय ५४, रा. रामपूर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते घरातील मधल्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. सकाळच्या सुमारास ही घटना निदर्शनास आल्यानंतर घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांनी तत्काळ आष्टी पोलिसांना दिली.
माहिती मिळताच आष्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, भाऊजी सलामे यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या घटनेची नोंद आष्टी पोलिसांनी घेतली असून, घटनेमागील कारणांचा तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Tags:
पोलिस विभाग