ठाकूरनगरच्या जंगलात वाघाचा थरार; गुराख्यावर झडप
वाघाच्या हल्ल्यात गणेश दास गंभीर जखमी; तीन बैलही जखमी, इतर गुराख्यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
चामोर्शी : जनावरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी सुमारास १२ वाजता ठाकूरनगर परिसरात घडली. या हल्ल्यात गणेश दास (वय ४८, रा. ठाकूरनगर) हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, हल्ल्यात तीन बैलही जखमी झाल्याची माहिती आहे.
गणेश दास हे नेहमीप्रमाणे गाय-बैल चारण्यासाठी ठाकूरनगरलगतच्या जंगल परिसरात गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. वाघाच्या हल्ल्यामुळे गणेश यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून जवळच असलेले इतर गुराखी मदतीसाठी धावून आले.
गुराख्यांनी एकत्रितपणे आरडाओरड करीत वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाघाने तेथून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या हल्ल्यात गणेश दास यांच्या शरीरावर जखमा झाल्या असून, सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
वन विभागाकडून घटनास्थळाची पाहणी
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरातील गुराखी व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याने शेतकरी व गुराख्यांनी जनावरे चारण्यासाठी जंगलात जाताना विशेष खबरदारी घ्यावी, तसेच एकट्याने जंगल परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.