धान्याचा लाभ नियमित मिळण्यासाठी रास्त भाव दुकानात प्रक्रिया करण्याचे तहसीलदारांचे आवाहन
गडचिरोली, दि. २५ सप्टेंबर (जिमाका) : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी, यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील पात्र सदस्यांची ई-केवायसी येत्या १५ दिवसांत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सागर कांबळे गडचिरोली यांनी केले आहे.
ही प्रक्रिया रास्त भाव दुकानात ई-पॉस यंत्राद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने केली जात आहे. रास्त भाव दुकानदारांनी लाभार्थ्यांना आवश्यक सहकार्य करून प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
ई-केवायसी प्रलंबित राहिल्यास पुढील महिन्यापासून धान्य मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे लाभार्थ्यांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करून धान्याचा लाभ नियमित सुरू ठेवावा, असे तहसीलदारांनी कळविले आहे.
Tags:
प्रशासन