प्रबुद्ध हायस्कूल मुरखळाचक येथे शाळा व्यवस्थापन समिती गठित

प्रबुद्ध हायस्कूल मुरखळाचक येथे शाळा व्यवस्थापन समिती गठित

पालकांच्या उपस्थितीत दोन वर्षांसाठी नूतन समितीची निवड; छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण

तालुका प्रतिनिधी चामोर्शी :-
ममता बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गडचिरोली द्वारा संचालित प्रबुद्ध हायस्कूल, मुरखळाचक येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये शाळेचे व्यवस्थापन सुरळीतपणे चालावे तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने दोन वर्षांच्या कालावधीसाठी नूतन शाळा व्यवस्थापन समितीची गठित करण्यात आली. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उपस्थितीत समिती गठित करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक टिचकुले होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे मावळते उपाध्यक्ष संदीप पाटील काकडेजी तसेच भूपेश कुळवे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीचे मावळते उपाध्यक्ष संदीप पाटील काकडेजी यांनी विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. या प्रतिमेच्या अनावरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
शासनाच्या निर्धारित सदस्य निवडीच्या निकषांनुसार शाळा व्यवस्थापन समितीची रचना करण्यात आली. त्यानुसार एकूण ७५ टक्के सदस्यांची निवड विद्यार्थ्यांच्या पालकांमधून, तर उर्वरित २५ टक्के सदस्यांमध्ये स्थानिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी, शाळेतील शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, विषयतज्ज्ञ, ज्येष्ठ विद्यार्थी, माजी विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच सहाय्यक परिचारिका यांचा समावेश करण्यात आला. सर्व पालकांच्या उपस्थितीत समितीची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
*नूतन शाळा व्यवस्थापन समिती*
अध्यक्ष : ज्ञानेश्वर गोहणे
उपाध्यक्ष : सौ. पुष्पाताई निलेश कुनघाडकर
सचिव : अशोक टिचकुले, मुख्याध्यापक
सदस्य : देवरावजी उराडे, अर्चनाताई ठेमस्कर, राकेश गुरनुले, कविताताई दशरथ कुनघाडकर, सुधाकर शेडमाके, प्रज्ञा सुरेश दुर्गे, पुरुषोत्तम मडावी, लिनाताई विनोद मंगाम, महेंद्र सोमनकर, राखी राकेश वाळके, सीमाताई गेडाम, प्रतिमाताई नरेश बारसागडे, विद्याताई गेडाम (आशा वर्कर), पुष्पाताई वाळके (अंगणवाडी सेविका), बोडावारताई (आरोग्य सेविका) आणि अनिरुद्ध कुनघाडकर (शिक्षणतज्ज्ञ) यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक टिचकुले आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी नवनियुक्त अध्यक्ष ज्ञानेश्वर गोहणे यांनी आपल्या मनोगतात विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. विद्यालयाने आतापर्यंत केलेली प्रगती आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा लेखाजोखा त्यांनी मांडला. नूतन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यालयाची प्रगती अधिक वेगाने व्हावी, तसेच शाळेला भविष्यात आणखी उंच भरारी घेता यावी, यासाठी समितीने सकारात्मक आणि सक्रिय भूमिका बजावावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन आनंद दुधे सर यांनी केले. तर दिलीप बोधे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित पालक व मान्यवरांना अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील अध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्याचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
थोडे नवीन जरा जुने