महागंगा आरतीस भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,उत्तरवाहिनी वैनगंगा तीरावर भक्तिमय सोहळ्याचे आयोजन

महागंगा आरतीस भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,उत्तरवाहिनी वैनगंगा तीरावर भक्तिमय सोहळ्याचे आयोजन

तालुका प्रतिनिधी चामोर्शी :
चामोर्शी तालुक्यातील विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री मार्कंडेश्वर देवस्थान, मार्कंडादेव येथे पवित्र उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या तीरावर सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता नेहमीप्रमाणे भव्य महागंगा आरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीचा पवित्र तीर भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक वातावरणाने भारून जाणार आहे.
महागंगा आरतीच्या सोहळ्याचे यजमान म्हणून श्रीकृष्ण अर्जुनकर साहेब सपत्नीक उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते पवित्र वैनगंगा मातेस विधिवत आरती अर्पण करण्यात येणार आहे. भगवान महादेवाच्या चरणी श्रद्धा अर्पण करण्याबरोबरच वैनगंगा मातेस आरती अर्पण करण्याचा हा मंगलमय सोहळा भाविकांसाठी विशेष धार्मिक व आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.
मार्कंडादेव हे प्राचीन श्री मार्कंडेश्वर देवस्थान आणि धार्मिक महत्त्वामुळे विदर्भातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर होणाऱ्या महागंगा आरतीला दरवेळी परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती लाभत असते. यंदाही या आरती सोहळ्यास चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्हा तसेच विदर्भातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
सायंकाळच्या प्रसन्न वातावरणात नदीच्या तीरावर होणारी सामूहिक आरती, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरण यामुळे या सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते. भाविकांनी कुटुंबीयांसह उपस्थित राहून भगवान महादेवाचे दर्शन घेण्यासोबतच पवित्र वैनगंगा मातेस आरती अर्पण करण्याच्या या मंगलमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, महागंगा आरतीचे यजमानपद स्वीकारू इच्छिणाऱ्या भाविकांनी रमेशजी बारसागडे, दिलीपजी चलाख, साईनाथजी बुरांडे तसेच सुरेशजी शहा यांच्याशी संपर्क साधावा, असेही आयोजकांनी कळविले आहे.
या धार्मिक सोहळ्यास परिसरातील तसेच संपूर्ण विदर्भातील भाविक भक्तांनी सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मार्कंडादेव येथील उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर मोठ्या संख्येने उपस्थित राहून महागंगा आरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने