आष्टीत धाडसी घरफोडी; १ लाख ८३ हजारांचा ऐवज लंपास

आष्टीत धाडसी घरफोडी; १ लाख ८३ हजारांचा ऐवज लंपास

कुलूप तोडून सोन्याचे दागिने व साहित्यावर चोरट्यांचा डल्ला; पोलिसांकडून तपास सुरू

महाराष्ट्र प्रहार न्यूज 
 
चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व इतर साहित्य असा एकूण १ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे आष्टी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चोरीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विलास गजानन बंडावार (वय ६७), रा. आष्टी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली हे दि. २० ऑगस्ट रोजी पत्नीसमवेत डोळ्याच्या ऑपरेशनसाठी गडचिरोली येथे गेले होते. दरम्यान, त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता बंडावार दाम्पत्य घरी परतले असता घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. घरातील लाकडी पेटी तसेच लोखंडी आलमारी तपासली असता त्यामधील सोन्याचे दागिने व इतर साहित्य चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरी गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ८३ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी बंडावार यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तोंडी रिपोर्ट दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा नोंद केला आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेळके पुढील तपास करीत आहेत.
थोडे नवीन जरा जुने